रोहित आमचा कर्णधार आहे… करोडोंच्या कारमधून हार्दिक पांड्या खाली उतरताच विमानतळावर चाहत्यांनी केली रोहित शर्माच्या नावाने घोषणाबाजी


हार्दिक पांड्या गुजरात टायटन्स सोडून मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाला, तेव्हापासून रोहितचे चाहते त्याच्या मागे लागले आहेत. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या गेल्या सामन्यात हार्दिकने चमकदार कामगिरी केली होती. यावर रोहित शर्माने त्याच्या पाठीवर थाप मारली. त्याने हार्दिकला आपला कर्णधार म्हणून स्वीकारल्याचे दिसत होते. पण चाहते अजूनही हार्दिकला कर्णधार म्हणून स्वीकारायला तयार नाहीत, असे दिसते. ते अजूनही रोहितला आपला कर्णधार मानतात. मुंबई इंडियन्सच्या नुकत्याच आलेल्या एका व्हिडिओनेही हे सिद्ध केले आहे. रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या पुढच्या सामन्यासाठी मुंबई संघासोबत विमानतळावर पोहोचले, तेव्हा चाहत्यांनी रोहितच्या नावाने घोषणाबाजी सुरू केली.

मुंबई संघ आपला पुढचा सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ईडन गार्डन्सवर खेळणार आहे. यासाठी टीम विमानतळावर पोहोचली होती. यादरम्यान, प्रथम दिग्गज गोलंदाज आणि मुंबईचा गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगा येतो. रोहित शर्माही त्याच्या मागे येताना दिसत आहे. चाहत्यांनी त्याला पाहताच ‘रोहित आमचा कर्णधार आहे’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. मुंबईच्या माजी कर्णधाराने चाहत्यांच्या घोषणांवर प्रतिक्रिया दिली नाही आणि चेक इन करण्यास सुरुवात केली. टीमसोबत हार्दिक पांड्याही उपस्थित होता. हा व्हिडिओ पाहून असे दिसते की चाहते अजूनही पांड्याला नव्हे, तर पाच ट्रॉफी जिंकणाऱ्या रोहितला आपला कर्णधार मानतात.


कोलकात्याला रवाना होण्यासाठी हार्दिक पांड्या करोडोंच्या कारमध्ये आला होता. तो विमानतळावर आलिशान मर्सिडीज कारमधून खाली उतरताना दिसला, ज्याची किंमत करोडोंची आहे. यावेळी हार्दिक निवांत दिसत होता.


हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघ एकसंध दिसत नव्हता. संपूर्ण हंगामात संघात मतभेद असल्याच्या बातम्या आल्या आहेत. यामुळे त्यांच्या कामगिरीवरही परिणाम झाला असून 12 पैकी 8 सामने गमावून संघ प्ले-ऑफमधून जवळपास बाहेर पडला आहे. मात्र, आता रोहित आणि हार्दिक यांच्यात हे प्रकरण मिटल्याचे दिसत आहे. कारण दोघेही एकमेकांपासून दूर असताना गेल्या सामन्यात एकत्र दिसले होते. 4 षटकात 3 विकेट्स घेतल्याबद्दल रोहित शर्माने त्याच्या पाठीवर कौतुकाची थापही दिली. याशिवाय, अशीही बातमी होती की, त्याच्या विनंतीवरून, त्याच्या खराब फॉर्मनंतरही, हार्दिकला T20 विश्वचषकात उपकर्णधार बनवण्यात आले आहे.