व्हायरल होत आहे गौरी आणि शाहरुख खानची लग्नानंतरची पहिली जाहिरात


गौरी खान आणि शाहरुख खानच्या लग्नाला 33 वर्षे झाली आहेत. गौरी खानने गेल्या काही वर्षांत शाहरुख खानला त्याच्या चांगल्या आणि वाईट काळात साथ दिली आहे. गौरी शाहरुखच्या प्रत्येक अडचणीत पाठीशी उभी राहिली आहे. गौरी खान व्यवसायाने निर्माती आणि इंटिरियर डिझायनर आहे आणि बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला तुम्ही ओळखता. पण तुम्हाला माहित आहे का पती-पत्नी दोघांनीही एकत्र काम केले आहे. 90 च्या दशकात गौरी खान आणि शाहरुख खान यांनी एक जाहिरात केली होती.

गौरी आणि शाहरुखचा 90 च्या दशकातील साबणाच्या जाहिरातीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सिंथॉल साबणाच्या जाहिरातीचा आहे, ज्यामध्ये शाहरुख खान आणि गौरी खान दोघेही तरुण दिसत आहेत. रिपोर्ट्सनुसार, या जाहिरातीत दोघेही लग्नानंतर पहिल्यांदाच नॅशनल टीव्हीवर एकत्र दिसले होते. 90 च्या दशकात आलेली ही जाहिरात लोकांना खूप आवडली आणि आता पुन्हा एकदा तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.


सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून लोक म्हणत आहेत की शाहरुख आणि गौरीचा व्हिडिओ पाहून त्यांना 90 च्या दशकाची आठवण झाली. एका यूजरने लिहिले की, “शाहरुख खान त्यावेळी खूप गोंडस दिसत होता.” आणखी एका यूजरने लिहिले की, “आज मला कळले की गौरी खान या जाहिरातीत होती. तेव्हा माहित नव्हते. हे दोघे पती-पत्नी आहेत.” व्हिडिओ पाहिल्यानंतर एका व्यक्तीने लिहिले की, “बालपणीच्या आठवणी” बहुतेक युजर्स या जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

दिल्लीतील एका पार्टीत शाहरुख खानने गौरीला पहिल्यांदा पाहिले. शाहरुख खानने तिला आपलेसे करण्यासाठी खूप प्रयत्न केले. शाहरुख खान गौरीच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की तिला शोधण्यासाठी तो मुंबईला देखील गेला होता. शाहरुख आणि गौरीनेही दोनदा लग्न केले आहे. कारण दोघांचे धर्म भिन्न होते. त्यामुळे दोघांनी एकदा हिंदू रितीरिवाजांनुसार आणि एकदा मुस्लिम रितीरिवाजांनुसार लग्न केले. आज शाहरुख खानही आपल्या यशाचे श्रेय गौरीला देतो.