Khatu Shyam Ji : कुरुक्षेत्रात महाभारतचे युद्ध झाले, मग राजस्थानात कसे पोहोचले बर्बरिकचे शीर, काय आहे त्यामागची कथा?


महाभारत युद्धात अनेक शूर योद्ध्यांनी हौतात्म्य पत्करले, पण एक असा योद्धा होता ज्याच्याकडे फक्त एका बाणाने महाभारत युद्ध संपवण्याची ताकद होती. त्या योद्ध्याचे नाव बर्बरिक होते, जो पांडूचा मुलगा भीमाचा नातू होता. बर्बरिककडे दैवी शक्ती होती. कलियुगात बर्बरिकची खातू श्याम नावाने पूजा केली जाते. राजस्थानमधील सीकरमध्ये बाबा खातू श्यामजींचे भव्य मंदिर आहे. या मंदिरात बर्बरिकच्या मस्तकाची पूजा केली जाते.

जरी तो युद्ध लढला नसला, तरी बर्बरिकने महाभारत युद्धात फार मोठे योगदान दिले, असे मानले जाते. पौराणिक कथेनुसार, बर्बरिककडे असे तीन बाण होते, ज्याने युद्ध एका क्षणात संपवले जाऊ शकत होते. बर्बरिकला वरदान मिळाले होते, की तो फक्त तीन बाणांनी तिन्ही जग जिंकू शकतो. युद्धाला निघताना त्याने आपल्या आईला सांगितले की युद्धात पराभूत होणाऱ्यांच्या बाजूने मी लढेन. त्यामुळे खातू श्यामला पराभूतांचा आधार म्हणतात.

जेव्हा भगवान कृष्णाला कळले की बर्बरिक या युद्धात भाग घेण्यासाठी येत आहे, तेव्हा ते चिंतित झाले, कारण त्यांना माहित होते की युद्धात पराभूत होणाऱ्यांना बर्बरिक साथ देईल. तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या मुत्सद्देगिरीने बर्बरिकला आपले मस्तक दान करण्यास सांगितले आणि बर्बरिकने आपली तलवार काढून श्रीकृष्णाला आपले मस्तक अर्पण केले. बर्बरिकचा हा त्याग पाहून श्रीकृष्णाने कलियुगात बर्बरिकला स्वतःच्या नावाने पूजले जाण्याचे वरदान दिले.

भगवान श्रीकृष्णाला आपले मस्तक दान केल्यानंतर त्याने संपूर्ण युद्ध पाहण्याची इच्छा व्यक्त केली. बर्बरिकची इच्छा पूर्ण करण्यासाठी, भगवान श्रीकृष्णाने बर्बरिकचे मस्तक एका टेकडीवर स्थापित केले, जिथून बर्बरिकने संपूर्ण युद्ध पाहिले. पौराणिक कथेनुसार, युद्ध संपल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने बर्बरिकला आशीर्वाद देऊन रूपवती नदीत फेकून दिले.

असे मानले जाते की कलियुगात बर्बरिकचे शीर सीकरच्या खातू गावात मातीत गाडलेले आढळले होते. एक गाय स्मशानभूमी ओलांडून जात असताना तिच्या कासेतून दूध वाहू लागले, असे म्हणतात. हा चमत्कार पाहून गावातील लोकांनी त्या ठिकाणी खोदकाम केले. ज्यामध्ये बर्बरिकतचे मस्तक सापडले, जे भगवान कृष्णाने नदीत फेकले होते.

बर्बरिकचे शीर सापडल्यानंतर खातू गावचा राजा रूपसिंग याला एक स्वप्न पडले, ज्यामध्ये त्याला एक मंदिर बांधून त्यात मस्तक स्थापन करण्याचा आदेश देण्यात आला आणि राजाने तेच केले. असे मानले जाते की आज खातू श्यामचा तलाव आहे, जिथे बर्बरिकचे शीर देखील सापडले होते. त्यामुळे या तलावालाही विशेष ओळख आहे.