बाबर आझमने 3 षटकार मारले, तर मी बंद करुन टाकेन माझे यूट्यूब चॅनल, पाकिस्तानी खेळाडूने दिले ओपन चॅलेंज


पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम हा टी-20 मधील त्याच्या स्ट्राइक रेटमुळे क्रिकेट तज्ञ आणि चाहत्यांच्या निशाण्यावर कायम असतो. त्याने टी-20 मध्ये सलामीला येऊ नये, असेही अनेक तज्ज्ञांचे मत आहे. कारण त्यामुळे इतर फलंदाजांना संधी मिळत नाही. टी-20 विश्वचषक पुढे आहे आणि त्याच्या सलामी येण्याच्या निर्णयावर पुन्हा वाद सुरू झाला आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटर बासित अली त्याच्या ओपनिंगमुळे इतका संतापला की त्याने बाबर आझमला खुले आव्हान दिले आहे.

टी-20 वर्ल्ड कपला जाण्यापूर्वी पाकिस्तानचा संघ आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध मालिका खेळणार आहे. या सगळ्यामध्ये फक्त बाबर आझमच ओपनिंग करताना दिसणार आहे. पण अनेक क्रिकेट तज्ज्ञांना ही रणनीती योग्य वाटत नाही. दरम्यान, माजी क्रिकेटर बासित अलीने बाबर आझमला खुले आव्हान दिले आहे. त्याने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर सांगितले की जर बाबरने टी-20 विश्वचषकातील कोणत्याही अव्वल संघाविरुद्ध सलग तीन षटकार मारले, तर तो टीव्हीवर दिसणे बंद करेल. माझे YouTube चॅनेल देखील बंद करेन. मात्र या कामात बाबर अपयशी ठरल्यास त्याला सलामीची जागा सोडावी लागेल.


बासित अली याने निदर्शनास आणून दिले की बाबरला हे काम अमेरिका आणि आयर्लंडसारख्या छोट्या संघासोबत नाही, तर केवळ एका बलाढ्य संघासह करावे लागेल. तो पुढे म्हणाला की, त्याने हे आव्हान स्वीकारले असेल, तर त्याने पुढे येऊन सांगावे.

सलामीला संथपणे खेळल्यामुळे बाबर आझमवर त्याच्याच माजी खेळाडूंनी बराच काळ टीका केली आहे. त्यांचा असा विश्वास आहे की या स्थितीसाठी दोन स्फोटक स्टार्टर्स आवश्यक आहेत. बाबरने कर्णधारपद गमावल्यानंतर त्याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आले. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत पुन्हा कर्णधार बनवल्यानंतर त्याने पुन्हा सलामीला येण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी संघ न्यूझीलंड क संघाविरुद्धही मालिका जिंकू शकला नाही. यानंतर माजी क्रिकेटपटूंनी यासाठी बाबरच्या संथ फलंदाजीला जबाबदार धरले होते. आता तो आगामी आयर्लंड, इंग्लंड आणि टी-20 विश्वचषकात सलामी करताना दिसणार आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा क्रिकेट तज्ज्ञांनी त्याच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.