VIDEO : IPL 2024 मध्ये ओलांडल्या गेल्या बेईमानीच्या सर्व मर्यादा, थर्ड अंपायरने आऊट फलंदाजाला दिले नॉट आऊट!


IPL 2024 मधील पंचांच्या निर्णयावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रत्येक सामन्यात असे काही ना काही घडत आहे की, त्यानंतर तिसऱ्या पंचांविरुद्ध विधाने केली जात आहेत. सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यातही असेच घडले. हैदराबादच्या डावात 15व्या षटकात असे काही घडले, ज्याने जगाला आश्चर्याचा धक्का बसला. हैदराबादचा फलंदाज ट्रॅव्हिस हेड 15व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर धावबाद झाला होता, पण तिसऱ्या पंचाने त्याला नाबाद घोषित केले.


ट्रॅव्हिस हेडने 15 व्या षटकात शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू चुकला. यानंतर संजू सॅमसनने विकेटच्या मागून चेंडू यष्टीवर मारला. चेंडू विकेटला लागला, तेव्हा हेडची बॅट हवेत होती. राजस्थानच्या खेळाडूंनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली, मात्र त्यानंतर तिसऱ्या पंचाने त्याला नाबाद घोषित केले. थर्ड अंपायरच्या म्हणण्यानुसार, जेव्हा चेंडू बेल्स उडून गेल्या, तेव्हा हेडची बॅट क्रीजवर आली होती, पण तसे नव्हते. त्यामुळेच थर्ड अंपायरच्या या निर्णयावर सर्वांनीच प्रश्न उपस्थित केले आहेत. इरफान पठाणनेही ट्विट करून हा निर्णय भयानक असल्याचे म्हटले आहे.

मात्र, तिसऱ्या पंचाचा निर्णय बाजूने आल्यानंतरही हेडला कोणताही फायदा झाला नाही. कारण पुढच्याच चेंडूवर हा खेळाडू बोल्ड झाला. ट्रॅव्हिस हेडने या सामन्यात 44 चेंडूत 58 धावांची खेळी केली. त्याच्या बॅटमधून 3 षटकार आणि 6 चौकार आले. बरं, हेडने चांगली खेळी केली, पण या मोसमात तिसऱ्या पंचाची कामगिरी काही विशेष झाली नाही. याच चुका प्लेऑफ किंवा फायनलमध्ये झाल्या तर त्याला जबाबदार कोण?