कोण आहे भक्ती सोनी? जिने तारक मेहताच्या सोधीसाठी केली होती विमानतळावर पिकअप-ड्रॉपची विनंती


‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या प्रसिद्ध टीव्ही मालिकेतील रोशनसिंग सोधी याच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता गुरचरण सिंग गेल्या 7 दिवसांपासून बेपत्ता आहे. गुरुचरण सिंग याचे वडील हरगीत सिंग यांनी दिल्ली पोलिसांकडे मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. तसेच पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. वास्तविक गुरुचरण सिंग 22 एप्रिलला मुंबईत येणार होता. त्याची मैत्रिण भक्ती सोनी तिला विमानतळावरून घेण्यासाठी जाणार होती. याआधीही गुरुचरण सिंह याने भक्तीला दिल्लीला जाण्यासाठी विमानतळावर सोडण्याची विनंती केली होती.

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या भक्ती सोनीच्या ऑडिओ क्लिपमध्ये तिने आपण गुरुचरण सिंग यांची ‘फॅमिली फ्रेंड’ असल्याचे म्हटले आहे. गुरचरणच्या आईला आपल्या मुलाची खूप आठवण येत होती आणि वडिलांचा वाढदिवसही एप्रिलमध्ये होता. या कारणास्तव अभिनेत्याने दिल्लीला जाण्याचा विचार केला होता. गोरेगाव पूर्वेतील गोकुळधाम येथील कृष्ण मंदिरात गुरुचरण भक्तीला भेटला, तेव्हा त्याने भक्तीला सांगितले की, मी आई-वडिलांना भेटण्यासाठी दिल्लीला जात आहे. यावेळी त्याने भक्तीला विमानतळावर सोडण्याची विनंतीही केली होती. त्यावेळी भक्तीने गुरुचरणला त्याच्या तब्येतीची काळजी घेण्याची आठवण करून दिली होती. कारण काही दिवसांपासून त्याचा रक्तदाब वाढला होता.


भक्ती म्हणाली, मला आठवते की गेल्या गुरुवारी आम्ही भेटलो, तेव्हा मी त्याला खायला दिले होते. त्याआधी त्याने 4 दिवस अन्न घेतले नव्हते. तो फक्त पाणी पीत होता. माझ्या सांगण्यावरून त्याने गुरुजींच्या आश्रमात जेवण केले. पण जेवल्यानंतर त्याच्या पोटात दुखू लागले. तब्येत ठिक नसतानाही तो दिल्लीला गेला. मीच त्याला विमानतळावर सोडले होते. 8.15 ला दिल्लीला पोहोचल्यावर त्याने मला दिल्लीला पोहोचल्याची माहिती दिली. त्या कॉलनंतर आमच्यात संवाद झाला नाही.

या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये भक्ती सांगत आहे की, ती गुरुचरण सिंग याची फॅमिली फ्रेंड होती. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भक्ती सोनी ही गुरुचरण सिंह याची ‘खास मित्र’ होती. दोघांनी अनेकदा एकत्र वेळ घालवला. व्यवसायाने इव्हेंट मॅनेजर असलेली भक्ती एका प्रोजेक्टच्या संदर्भात गुरुचरणला भेटली होती. यादरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री निर्माण झाली. केवळ कार्यक्रमांमध्येच नाही, तर अनेक सार्वजनिक ठिकाणीही दोघांना एकत्र पाहिले गेले आहे.