अक्षय कुमारचे ते पाच चित्रपट, ज्यांनी बडे मियाँ छोटे मियाँ पेक्षाही केली वाईट कामगिरी


अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा सिनेमा ईदच्या मुहूर्तावर रिलीज झाला. हा चित्रपट रिलीज होऊन सुमारे चार दिवस उलटले आहेत. या चित्रपटाचे भरपूर प्रमोशन करण्यात आले, पण आजपर्यंत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. खराब सुरुवात असूनही अक्षयच्या चित्रपटाने त्याच्या अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. अक्षयच्या त्या चित्रपटांवर एक नजर टाकूया, ज्यांनी रिलीजच्या पहिल्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ पेक्षाही वाईट कामगिरी केली.

1991 मध्ये ‘सौगंध’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या अक्षय कुमारने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण, त्याचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवरही फ्लॉप ठरले. आता ‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या कमाईवर नजर टाकली, तर पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाने जगभरात सुमारे 60 कोटींची कमाई केली आहे.

अक्षय कुमारचा ‘मिशन रानीगंज’ गेल्या वर्षी रिलीज झाला होता. हा चित्रपट 1989 मध्ये पश्चिम बंगालमधील राणीगंज येथे झालेल्या कोळसा क्षेत्र दुर्घटनेवर तयार करण्यात आला होता. 55 कोटी रुपयांमध्ये बनलेल्या या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत जगभरात 15.90 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.

‘सेल्फी’ 2023 साली रिलीज झाला होता. सुमारे 100 कोटींच्या प्रचंड बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत केवळ 15.20 कोटींचा गल्ला जमवला होता. या यादीतील पुढचे नाव आहे ‘रक्षा बंधन’. 70 कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत 30 कोटींची कमाई केली होती.

‘सम्राट पृथ्वीराज’ 2022 साली प्रदर्शित झाला होता. 220 कोटींच्या प्रचंड बजेटमध्ये बनलेल्या या पिक्चरने रिलीजच्या पहिल्या तीन दिवसांत 50 कोटींचा व्यवसाय केला होता. ‘बच्चन पांडे’ देखील 2022 साली आला होता. हा चित्रपट 165 कोटी रुपयांमध्ये बनला होता. त्याचबरोबर या चित्रपटाची पहिल्या तीन दिवसात 44 कोटींची कमाई केली होती.