IPL 2024 : का होत आहे केएल राहुलला ‘संरक्षण मंत्री’ करण्याची चर्चा? सत्य आहे हैराण करणारे


लखनौ सुपर जायंट्सने रविवारी दोन नवे विक्रम रचले. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एलएसजी संघाने गुजरात टायटन्स संघाचा पराभव केला. याशिवाय 160 पेक्षा जास्त स्कोअरचा 13व्यांदा बचाव केला. यासह संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. लखनौ संघाने गुजरातसमोर 164 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण यश ठाकूरची धारदार गोलंदाजी आणि मार्कस स्टॉइनिसच्या अष्टपैलू कामगिरीमुळे गुजरातला दारुण पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना 160 हून अधिक धावा केल्यानंतर, लखनौने अद्याप एकही सामना गमावलेला नाही, ज्याचे ‘संरक्षण मंत्री’ कर्णधार केएल राहुल आहेत. फ्रँचायझीने हे विशेष यश सोशल मीडियावर अतिशय मनोरंजक पद्धतीने शेअर केले आहे. कर्णधार केएल राहुलनेही या कामगिरीबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कर्णधार केएल राहुलने विजयासह या विक्रमाचे श्रेय युवा गोलंदाजांना दिले. तो म्हणाला की 160 पेक्षा जास्त धावा 13 वेळा डिफेन्स करणे हा खूप खास विक्रम आहे. आमच्या युवा गोलंदाजांनी येथील परिस्थितीशी उत्तम प्रकारे जुळवून घेतले आहे. गेल्या मोसमातही हे सर्वजण संघासोबत होते. प्रत्येकाला त्यांची भूमिका समजली आहे आणि ते विकेट चांगले वाचत आहेत. नेट आणि सराव सत्रादरम्यानही, दबावाखाली योग्य निर्णय कसा घ्यावा याबद्दल मी त्यांच्याशी बोलतो.


लखनौ सुपर जायंट्सने 2022 मध्ये आयपीएलचा प्रवास सुरू केला. आतापर्यंत संघाने 18 वेळा प्रथम फलंदाजी केली आहे, त्यापैकी 15 वेळा संघ जिंकला आहे आणि 2 वेळा पराभव पत्करावा लागला आहे. प्रथम फलंदाजी करताना त्यांचे विजयाचे प्रमाण 7.500 आहे. लखनौनंतर दुसरा सर्वोत्तम बचाव करणारा संघ राजस्थान रॉयल्स आहे, ज्यांचे प्रथम फलंदाजी करताना विजयाचे प्रमाण 1.444 आहे.

केएल राहुलने विशेषत: संघाच्या फिरकीपटूंचे कौतुक केले. त्याने लखनौचे तीन फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई, एम सिद्धार्थ आणि कृणाल पंड्या या संघाचे मुख्य भाग म्हणून वर्णन केले. त्याने खुलासा केला की एम सिद्धार्थकडे नवीन चेंडूची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याने विकेट्स देखील घेतल्या आहेत. पण सुरुवातीच्या षटकांमध्ये धावा रोखणे हे त्याचे मुख्य काम आहे.