हार्दिक आणि रोहितमधील दुरावा झाला कमी? आता आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स करणार धम्माल!


हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा यांच्यातील कर्णधारपदाचा वाद सध्या आयपीएलमध्ये सर्वाधिक चर्चेत आहे. हार्दिककडे कर्णधारपद मिळाल्यापासून दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. असे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते, जे पाहून असे म्हणता येईल की दोघांमध्ये सर्व काही ठीक नाही. याचा सर्वाधिक फटका संघाला बसला आहे. मुंबईने आतापर्यंतचे तिन्ही सामने गमावले असून गुणतालिकेत ते तळाशी आहे. मात्र यादरम्यान संघाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. एमआयटीव्हीवर एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे, जो पाहून असे दिसते की दोन्ही खेळाडूंमधील मतभेद संपले आहेत. असे झाले तर मुंबईची कामगिरी सुधारू शकते.

अनेक वेळा खेळाडूंना मानसिक आणि शारीरिक थकवा दूर करण्यासाठी गेटअवे ब्रेक दिला जातो. यादरम्यान संघातील खेळाडू एकमेकांसोबत वेळ घालवतात. त्यामुळे खेळाडूंमधील मैत्रीही वाढते. मुंबई इंडियन्सनेही आपल्या खेळाडूंना अशीच सुट्टी दिली होती. एमआयटीव्हीवर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये, रोहित आणि हार्दिक प्रवासादरम्यान हस्तांदोलन करताना आणि बोलताना दिसले.


मुंबई इंडियन्सने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या इशान किशनला अतिशय प्रेमाने मिठी मारताना दिसत आहे. हार्दिक, बुमराह आणि ईशान व्यावसायिक शूट दरम्यान एकत्र दिसले होते, जिथे इशान हसत होता आणि विनोद करत होता. यानंतर मुंबईच्या संपूर्ण टीमने साहसी सहल केली. या सहलीत ॲक्वा ॲडव्हेंचरचा आनंद घेतल्यानंतर सायंकाळी वादकांनी संगीताचाही आनंद लुटला.

गेट अवे ब्रेक दरम्यान, मुंबईचे खेळाडू एकमेकांसोबत अगदी निवांत दिसत होते. तसेच मजामस्ती करताना दिसले. वादाच्या भोवऱ्यात मुंबईच्या चाहत्यांसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे. खरेच खेळाडूंमध्ये पुन्हा बॉन्डिंग निर्माण झाले, तर येत्या सामन्यांमध्ये संघाच्या कामगिरीत सुधारणा दिसून येईल. मात्र, मुंबई सध्या पॉइंट टेबलमध्ये सर्वात खालच्या स्थानावर आहे. पण याआधीही, एका मोसमात पहिले तीन किंवा त्याहून अधिक सामने गमावूनही संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यशस्वी झाला आहे. 2015 च्या मोसमात, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, मुंबई इंडियन्सने त्यांचे पहिले 4 सामने गमावले होते. त्यानंतर संघाने पुनरागमन केले आणि केवळ प्लेऑफसाठी पात्रच नाही, तर ट्रॉफीही जिंकली. तसेच सूर्यकुमार यादवही संघात पुनरागमन करत आहे. यामुळे संघाची मधली फळी आणखी मजबूत होईल.