Video : शिवम दुबेने तुफान फटकेबाजी करत तोडली बॅट, ठोकले झंझावाती अर्धशतक, धोनीने केला सलाम


आयपीएल 2024 च्या 7 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. चेन्नई संघाने गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांची धुलाई करत 20 षटकांत 206 धावा केल्या. या फटकेबाजीत सर्वात मोठे योगदान शिवम दुबेचे होते, ज्याच्या बॅटने सर्वाधिक 51 धावा केल्या. शिवम दुबेची खेळी अप्रतिम होती, हा खेळाडू चौथ्या क्रमांकावर आला आणि त्याने 23 चेंडूत 51 धावा केल्या. दुबेने आपल्या डावात 5 षटकार मारले आणि त्याचा स्ट्राईक रेट 221 पेक्षा जास्त होता. दुबेची खेळी इतकी शानदार होती की धोनीही त्याच्यासाठी टाळ्या वाजवताना दिसला.


अजिंक्य रहाणेची विकेट पडल्यानंतर शिवम दुबे क्रीजवर आला. रहाणेची विकेट साई किशोरने घेतली. साई किशोर फॉर्ममध्ये दिसत होता, पण यानंतर शिवम दुबेने क्रिजवर येताच त्याच्यावर हल्ला केला. दुबेने आपल्या डावातील पहिल्या चेंडूवर षटकार मारला आणि दुसऱ्या चेंडूवरही त्याने एक लांबलचक षटकार मारला. दुबेने येताच आपला इरादा व्यक्त केला.

दुबे एवढ्यावरच थांबला नाही आणि स्पेन्सर जॉन्सन आणि मोहित शर्मा यांच्यावर जोरदार आक्रमण केले. शिवम दुबे लांब षटकार मारत असतानाच त्याची बॅटही तुटली. म्हणजेच दुबेने किती जोरदार फटकेबाजी केली असेल याचा अंदाज येऊ शकतो. दुबे अर्धशतक पूर्ण करून बाद झाला असला, तरी त्याने आपले काम चोख बजावले होते.


शिवम दुबेने गेल्या मोसमापासून चेन्नईसाठी कहर केला होता. या डावखुऱ्या फलंदाजाने गेल्या मोसमात 16 सामन्यांत 418 धावा केल्या होत्या आणि त्याचा स्ट्राईक रेट 150 पेक्षा जास्त होता. या हंगामातही पहिल्या सामन्यात दुबेने नाबाद 34 धावा करत चेन्नईला विजय मिळवून दिला आणि आता त्याच्या बॅटमधून 51 धावा झाल्या. आता हे स्पष्ट आहे की दुबे सीएसकेसाठी सातत्याने चांगली कामगिरी करत आहे आणि त्यामुळेच तो आता या संघाचा महत्त्वाचा भाग बनला आहे.