MS Dhoni Catch : धोनीने घेतला आश्चर्यकारक झेल, आता निवृत्तीचा विचार करणेही चुकीचे !


एमएस धोनी 42 वर्षांचा आहे आणि असे म्हटले जात आहे की हा खेळाडू आयपीएलच्या या हंगामानंतर निवृत्त होऊ शकतो. पण सध्या याचा विचार करणेही चुकीचे ठरेल, कारण वयाच्या 42 व्या वर्षी या खेळाडूने एक चमत्कार केला आहे, जो खरोखरच थक्क करणारा आहे. IPL 2024 च्या 7 व्या सामन्यात धोनीने गुजरात टायटन्स विरुद्ध एक अप्रतिम झेल घेतला. हा झेल इतका नेत्रदीपक होता की टीकाकारही धोनीचे चाहते झाले.

अष्टपैलू डॅरेल मिशेलच्या चेंडूवर धोनीने हा अप्रतिम झेल घेतला. मिशेलच्या चेंडूवर विजय शंकरने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू बॅटच्या बाहेरील कडा घेऊन स्लिपच्या दिशेने गेला. दरम्यान, धोनीने उजवीकडे जबरदस्त डायव्ह टाकत चेंडू पकडला. धोनीचा हा झेल शानदार होता, कारण चेंडू वेगाने स्लिपकडे जात होता. अशा कॅचमध्ये रिॲक्शन टाइम कमी असतो, पण धोनीने ते सोपे केले. हा झेल टिपण्यासाठी धोनीने 2.27 मीटर लांब डाईव्ह मारली, जो 42 वर्षांच्या खेळाडूसाठी खूपच जास्त आहे. धोनीचा फिटनेस इतका अप्रतिम आहे की त्याला हा झेल पकडण्यात कोणतीही अडचण आली नाही.


या सीझनला सुरुवात होण्यापूर्वीच धोनीने कर्णधारपद सोडले होते. ऋतुराज गायकवाड याच्याकडे त्याने संघाची कमान सोपवली असून ते संपूर्ण संघाचे नेतृत्व उत्तम प्रकारे करत आहेत. धोनीही त्याला यात मदत करत असला, तरी कुठेतरी असे मानले जात आहे की आता हा खेळाडू त्याचा शेवटचा सीझन खेळत आहे.