अमूलने रचला इतिहास, आता अमेरिकाही पिणार भारतीय दूध


अमूल दूध पीता है इंडिया… नाही-नाही, आता केवळ भारतातीलच नव्हे तर अमेरिकेतील लोकही हे गाणे गाणार आहेत, कारण आता अमेरिका अमूल ब्रँडचे दूधही आनंदाने पिणार आहे. यासह अमूल ब्रँडचे मालक असलेल्या गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशननेही नवा इतिहास रचला आहे. अमेरिकेत भारतीय डेअरी ब्रँडची ही पहिलीच एंट्री आहे.

भारतात दररोज लाखो लिटर ताजे दूध पुरवणारा अमूल ब्रँड आता अमेरिकेतही आपली ताकद दाखवणार आहे. अमूल ब्रँड येथील ताज्या दुधाच्या विभागात काम करेल.

गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) ने अमूल ब्रँडचे दूध अमेरिकेत विकण्यासाठी अमेरिकेतील 108 वर्षे जुनी डेअरी ‘मिशिगन मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशन’ सोबत करार केला आहे. जीसीएमएमएफचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी सहकाराच्या वार्षिक बैठकीत ही घोषणा केली. अमूल ब्रँडची ताज्या दुधाची श्रेणी भारताबाहेर अमेरिकेसारख्या बाजारपेठेत लाँच होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अमेरिकेत भारतीय वंशाच्या समुदायाची मोठी लोकसंख्या आहे.


अमूल यूएसमध्ये एक गॅलन (3.8 लीटर) आणि अर्धा गॅलन (1.9 लीटर) च्या पॅकेजिंगमध्ये दूध विकणार आहे. अमेरिकेत फक्त 6% फॅट असलेला अमूल गोल्ड ब्रँड, 4.5% फॅट असलेला अमूल शक्ती ब्रँड, 3% फॅट असलेला अमूल ताजा आणि 2% फॅट असलेला अमूल स्लिम ब्रँड विकला जाईल. हे ब्रँड सध्या ईस्ट कोस्ट आणि मिड-वेस्ट मार्केटमध्ये विकले जातील.

अमूल हे भारतातील घराघरात पोहचलेले नाव आहे. हा भारतातील सुपर ब्रँडपैकी एक आहे. एवढेच नाही, तर भारतात ‘श्वेतक्रांती’ आणण्यात अमूलचे मोठे योगदान आहे. त्याच्या यशामुळे भारतात दुग्ध सहकारी संस्थांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आणि त्यामुळे राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाचा पायाही घातला गेला.