Ranji Trophy Final : मुंबईने अंतिम फेरीत विदर्भाचा पराभव करत 42व्यांदा जिंकली रणजी ट्रॉफी


मुंबईने पुन्हा एकदा रणजी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम फेरीत विदर्भाचा 169 धावांनी पराभव करून हे यश संपादन केले. मुंबईने विदर्भासमोर 538 धावांचे डोंगरासारखे लक्ष्य ठेवले होते, ते गाठण्यात विदर्भाचा संघ अपयशी ठरला. यासह, रणजी इतिहासातील या सर्वात यशस्वी संघाने आपल्या कपाटात आणखी एक करंडक जोडला आहे. मुंबई संघाचे हे 42वे रणजी विजेतेपद आहे.

विदर्भाचा पराभव करून मुंबईने रणजी करंडक स्पर्धेतील विजेतेपदाची 9 वर्षांची प्रतीक्षाही संपवली. त्यांनी शेवटचे 2015-16 मध्ये हे विजेतेपद पटकावले होते. विदर्भाबद्दल बोलायचे झाले, तर रणजी ट्रॉफीची अंतिम फेरी खेळण्याची ही तिसरी वेळ होती. याआधी झालेल्या दोन्ही फायनलमध्ये त्यांनी विजय मिळवला होता. पण यावेळी ते चॅम्पियन होऊ शकले नाही आणि ट्रॉफी मुंबईकडे गेली.

रणजी ट्रॉफी फायनलमध्ये मुंबईने दिलेल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भाचा संघ दुसऱ्या डावात केवळ 368 धावाच करू शकला आणि विजयाच्या लक्ष्यापासून 169 धावा दूर राहिला. मुंबईकडून दुसऱ्या डावात तनुष कोटियनने सर्वाधिक 4 बळी घेतले. विदर्भासाठी ए. वाडकरने शतक झळकावले. याशिवाय करुण नायर आणि हर्ष दुबे यांनी अर्धशतके झळकावली, पण ते संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेसे ठरले नाही.


तत्पूर्वी, मुंबईसाठी दुसऱ्या डावात मुशीर खानने शतक झळकावले, खराब फॉर्ममधून परतलेल्या अजिंक्य रहाणेने 73 धावा आणि श्रेयस अय्यरने 95 धावा केल्या. याशिवाय शम्स मुलानीनेही अर्धशतक झळकावले. परिणामी मुंबईने 418 धावा केल्या.

दरम्यान मुंबईने पहिल्या डावात 224 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल विदर्भ संघाची अवस्था आणखीनच बिकट झाली आणि पहिल्या डावात 105 धावाच करू शकला, त्याचे परिणाम त्यांना सामन्यात नंतर भोगावे लागले.