पाण्याने भिजला फोन, तर तांदळामध्ये सुकवायचा का? फायदा होईल की तोटा


तुमचा फोन पाण्यात भिजला आहे का? ही एक समस्या आहे, ज्याचा सामना जगभरातील लोकांना वारंवार करावा लागतो. फोन पाण्यात पडणे कोणासोबतही होऊ शकते, परंतु तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. काही सोप्या पद्धतींचा अवलंब करून तुम्ही तुमचा फोन वाचवू शकता. पाण्यात भिजलेला फोन सुकवण्यासाठी तांदूळ वापरणे ही एक सामान्य पद्धत आहे. पण फोन सुकवण्यासाठी तांदूळ वापरणे योग्य आहे का? ते आम्ही तुम्हाला सांगतो.

समजा तुमच्या हातातून फोन निसटला आणि पाण्यात पडला किंवा फोन बाथटब वगैरे मध्ये पडला, तर काय कराल? ओला फोन सुकवण्यासाठी लोक अनेक युक्त्या वापरतात. तांदूळ देखील यापैकी एक आहे, कारण तांदळामध्ये ओलावा शोषण्याची क्षमता असते. त्यामुळे ओले फोन सुकवण्यात तांदूळ अधिक चांगले काम करू शकतो, असे मानले जाते.

ओला फोन कसा स्वच्छ करायचा?
जर फोन ओला झाला, तर तो सुकवणे महत्वाचे आहे. तुमचा फोन पाण्यात पडला, तर तो स्वच्छ कापडाने स्वच्छ करावा. मोबाईलमधील सिमकार्ड काढून फोनमधील पाणी काढून स्वच्छ करावा. शक्य असल्यास, फोन बंद केला पाहिजे आणि बॅटरी बाहेर काढली पाहिजे.

तांदळाने कोरडा होईल आयफोन ?
Apple ने स्वतः सांगितले आहे की ओला आयफोन कसा सुकवायचा. अॅपलच्या मते, आयफोन उघडता येत नाहीत, त्यामुळे त्यांना हलक्या दाबाने हातावर मारले पाहिजे. लक्षात ठेवा की आयफोनचा कनेक्टर पोर्ट खालच्या दिशेने असावा, जेणेकरून जे काही पाणी किंवा द्रव असेल ते बाहेर येऊ शकेल.

जोपर्यंत तांदळाने कोरडे करण्याचा प्रश्न आहे, अॅपल तसे करण्यास नकार देते. ॲपलच्या मते, जर तुमच्याकडे आयफोन असेल, तर तो तांदळासोबत सुकवू नये.

सॅमसंग फोन असल्यास काय करावे?
सॅमसंग म्हणतो की ओला मोबाईल सुकवण्यासाठी कॉटन बड वापरा. यासह, फोनचा इअरफोन जॅक आणि चार्जिंग पोर्ट पूर्णपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आयफोनच्या उघड्या भागांमध्ये कापूस टाकू नये, असे ॲपलचे म्हणणे आहे.

जर तुमच्याकडे अँड्रॉइड फोन असेल तर तांदूळ सुकवण्यासाठी वापरता येतो. तथापि, तांदूळ मोठा असावा आणि फोनच्या पोर्टमध्ये जाऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. हे फोन कोरडे होण्यास मदत करेल आणि पोर्ट देखील सुरक्षित राहतील.

तुम्ही तुमचा फोन स्वच्छ पाण्याऐवजी घाणेरड्या पाण्यात पडला असेल, तर सॅमसंगने महत्त्वाचा सल्ला दिला आहे. घाणेरड्या पाण्यात भिजलेला फोन स्वच्छ पाण्याने स्वच्छ करावा, त्यामुळे फोनमधील घाण निघून जाईल, असे कंपनीचे म्हणणे आहे. असे केल्याने फोनच्या सर्किटमधील गंज इत्यादी समस्या दूर होतात.

ॲपल आणि सॅमसंग या दोन्ही कंपन्यांचे मत आहे की ओले फोन हवेशीर ठिकाणी सोडले पाहिजेत. तर गुगलच्या म्हणण्यानुसार, ओला फोन फक्त खोलीच्या तापमानात सोडला पाहिजे.

चुकूनही हे करू नका
पाण्यात भिजलेल्या फोनवर हेअर ड्रायर किंवा कॉम्प्रेस्ड एअर कधीही वापरू नये. याशिवाय फ्रीजरमध्येही ठेवू नये. यामुळे फोनमध्ये शॉर्ट सर्किटची समस्या उद्भवू शकते आणि ते काम करणे थांबवू शकते. याशिवाय, ओला फोन चालू करण्याचा प्रयत्न करू नका किंवा केबल चार्जरने चार्ज करू नका.