Shaitaan Collection Day 1: पहिल्याच दिवशी चालली ‘शैतान’ची जादू, अजय देवगणच्या चित्रपटाने केली तुफान कमाई


अजय देवगण, आर माधवन आणि ज्योतिका यांचा ‘शैतान’ चित्रपट काल म्हणजेच 8 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. ‘शैतान’ रिलीज होण्यापूर्वीच चर्चेत होता. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. रिलीजपूर्वी ॲडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत या चित्रपटाने उत्कृष्ट व्यवसाय केला होता. त्यानंतर ‘शैतान’च्या ओपनिंग कलेक्शनकडून सगळ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचे आकडेही समोर आले आहेत.

अजय देवगणच्या हॉरर ड्रामा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहते त्याच्या रिलीजची वाट पाहत होते. आज चित्रपटाच्या प्रदर्शनाचा दुसरा दिवस आहे. ॲडव्हान्स बुकिंगचे आकडे पाहता शैतान पहिल्या दिवशी सुमारे 8 ते 12 कोटी रुपयांचा व्यवसाय करेल असा अंदाज होता. पण पहिल्या दिवसाच्या कमाईने निर्माते चांगलेच खूश झाले आहेत. चित्रपटाची सुरुवात चांगली मानली जाते.

सकनिल्कच्या ताज्या रिपोर्टनुसार, अजय देवगण, आर माधवन आणि ज्योतिकाच्या ‘शैतान’ चित्रपटाने पहिल्या दिवशी तब्बल 14.50 कोटींची कमाई केली आहे. 60 ते 65 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या शैतानचे हे आकडे अद्याप प्राथमिक आहेत. यामध्ये अजूनही काही बदल होऊ शकतात. परंतु हे आकडे उत्कृष्ट मानले जात आहेत आणि शनिवार आणि रविवारच्या कमाईत वाढ अपेक्षित आहे.

एका रिपोर्टनुसार, शैतानच्या रिलीजच्या पहिल्या दिवशी 3844 शो चालवले गेले. आर माधवनने या चित्रपटात शैतानाची महत्त्वाची भूमिका साकारली आहे. त्याचे कामही खूप पसंत केले जात आहे. या चित्रपटाला टक्कर देण्यासाठी साऊथचे दोन चित्रपटही प्रदर्शित झाले आहेत. गामी आणि भीमा हे चित्रपटही 8 मार्चला थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत.