बेन स्टोक्सने 9 महिन्यांनंतर केली गोलंदाजी, पहिल्याच चेंडूने जगाला केले चकित, रोहित शर्माला समजलेच नाही काय झाले ते


इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स हा एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. पण तो बराच काळ गोलंदाजी करत नव्हता. इंग्लंड संघ सध्या भारताविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील 4 सामन्यांमध्ये बेन स्टोक्सने गोलंदाजी केली नव्हती, मात्र धरमशाला येथे खेळल्या जात असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात स्टोक्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच चेंडूवर असे काही केले की ज्यांनी पाहिले त्या सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. धर्मशाला कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्टोक्सने गोलंदाजी केली. तो नऊ महिन्यांनंतर गोलंदाजी करत होता आणि पहिल्याच चेंडूवर त्याने रोहित शर्माची विकेट घेतली.

स्टोक्सने धरमशाला कसोटी सामन्यापूर्वी जून 2023 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात शेवटची गोलंदाजी केली होती. पण यानंतर न्यूझीलंड मालिकेदरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने तो गोलंदाजी करू शकला नाही. जून 2023 नंतर, स्टोक्सने मार्च 2024 मध्ये कसोटीत गोलंदाजी केली, म्हणजेच जवळपास नऊ महिन्यांनंतर स्टोक्सने कसोटीत गोलंदाजी केली.

भारताच्या डावाच्या 62 व्या षटकात स्टोक्सने बॉल हाती घेतला आणि पहिल्याच चेंडूवर रोहितला बोल्ड केले. स्टोक्सने ऑफ स्टंपच्या ओळीत चेंडू टाकला. हा चेंडू आत येईल असे रोहितला वाटले, पण शेवटच्या क्षणी चेंडूने दिशा बदलली आणि थोडासा बाहेर आला. चेंडू रोहितच्या बॅटला चकवा देत थेट ऑफ स्टंपवर गेला. या चेंडूवर आऊट झाल्यानंतर रोहितही हैराण झाला. चेंडू कधी आणि कुठे गेला आणि कधी त्याच्या स्टंपवर आदळला, हे त्यालाच समजले नाही. मात्र, रोहितने आऊट होण्यापूर्वीच शतक पूर्ण केले होते. रोहितने 162 चेंडूत 13 चौकार आणि 3 षटकारांसह 103 धावा केल्या. भारताची दुसरी विकेट म्हणून रोहित बाद झाला. यासह रोहित आणि शुभमन गिल यांच्यातील 171 धावांची भागीदारीही तुटली.


स्टोक्सने धरमशाला कसोटी सामन्यापूर्वीच संकेत दिले होते की, तो पाचव्या कसोटी सामन्यात गोलंदाजी करू शकतो. तो म्हणाला होता की तो सुरुवातीपासून नेटमध्ये गोलंदाजी करत आहे आणि त्याला छान वाटत आहे. मात्र, वैद्यकीय पथकाशी बोलून अंतिम निर्णय घेण्याचे त्याने सांगितले होते. इंग्लंडच्या कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यानेही स्टोक्स धरमशालामध्ये गोलंदाजी करू शकतो, असे संकेत दिले होते. आता स्टोक्स सतत गोलंदाजी करतो की अधूनमधून गरज पडेल, तेव्हा अर्धवेळ गोलंदाज म्हणून गोलंदाजी करतो हे पाहावे लागेल.