DCW vs UPW : शेफाली, लॅनिंगने दाखवली बॅटची ताकद, दिल्लीने 9 गडी राखून जिंकला सामना


शेफाली वर्मा आणि कर्णधार मेग लॅनिंग यांच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने सोमवारी बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या महिला प्रीमियर लीग सामन्यात यूपी वॉरियर्सचा पराभव केला. दिल्लीने हा सामना नऊ विकेटने जिंकला. या सामन्यात यूपीचा संघ दिल्लीविरुद्ध टिकू शकला नाही. प्रथम त्यांची फलंदाजी कोलमडली आणि 20 षटकांत नऊ गडी गमावून संघाला केवळ 119 धावा करता आल्या. दिल्लीसाठी हे लक्ष्य सोपे होते. त्यांनी 14.3 षटकांत एक विकेट गमावून हे लक्ष्य गाठले.

शेफालीने दिल्ली कॅपिटल्ससाठी अर्धशतकी खेळी खेळली. तिने 43 चेंडूत नाबाद 64 धावा केल्या. तिला कॅप्टन लॅनिंगनेही साथ दिली. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी 119 धावांची भागीदारी करून संघाचा विजय निश्चित केला. लॅनिंगने 51 धावांची खेळी खेळली, ज्यात तिने 43 चेंडूंचा सामना केला आणि सहा चौकार मारले. 119 च्या एकूण धावसंख्येवर लॅनिंगची विकेट पडली, अन्यथा दिल्लीचा विजय 10 गडी राखून निश्चित होता.

यूपीच्या गोलंदाजांना जास्त धावसंख्या वाचवता आली नाही. अशा स्थितीत त्यांनी दमदार गोलंदाजी करून सुरुवातीचे यश मिळवायला हवे होते. पण सोफी एक्लेस्टन, दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड, ताहिला मॅकग्रा या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना हे करता आले नाही. शेफालीने येताच वादळ निर्माण करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर ती थांबण्याची चिन्हे दिसत नव्हती. तिने नवव्या षटकातील पाचव्या चेंडूवर चौकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. कॅप्टन लॅनिंगने शेफालीला पूर्ण साथ दिली. शेफालीला तिचा खेळ खेळता यावा म्हणून तिने स्ट्राइक रोटेट करण्याचे काम केले. दोघींचे हे शहाणपण यूपीला महागात पडले आणि संघाने सामना गमावला.

शेफालीच्या झंझावाती फलंदाजीपुढे राधा यादव आणि मारिजाने कॅपने यूपीची अवस्था वाईट केली. या दोघींची गोलंदाजी यूपीच्या फलंदाजांसाठी कठीण ठरली. दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कॅपने खाते न उघडता दिनेश वृंदाला बाद केले. तिचा पुढचा बळी होता ताहिला मॅकग्रा. मॅकग्राने एक धाव घेतली आणि पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ती बोल्ड झाली. संघाला कर्णधार ॲलिसा हिलीकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण कॅपने तिला लवकर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. हिलीला केवळ 13 धावा करता आल्या. संघ अडचणीत होता, पण विकेट पडण्याची प्रक्रिया थांबत नव्हती.

श्वेता सेहरावतने एका टोकाला पाय रोवून संघाला शंभरचा टप्पा पार करून दिला आणि संघाची लाज वाचवली. श्वेताने 45 धावांची खेळी केली. 42 चेंडूंचा सामना करताना तिने पाच चौकार आणि एक षटकार लगावला. ग्रेस हॅरिसने तिला साथ देण्याचा प्रयत्न केला, पण तिचा डाव 17 धावांच्या पुढे नेऊ शकला नाही. राधाने श्वेताला तिचे अर्धशतक पूर्ण करू दिले नाही. राधाने किरण नवगिरे आणि सोफी एक्लेस्टनचा डावही संपवला. राधाने चार षटकात 20 धावा देत चार बळी घेतले. कॅपने चार षटकांत पाच धावा देत एक बळी घेतला.