‘म्हातारी शेट्टी’ म्हणणाऱ्या ट्रोलर महिलेला शिल्पा शेट्टीची बहीण शमिताने दिले चोख प्रत्युत्तर


गेल्या काही दिवसांपासून शिल्पा शेट्टीची धाकटी बहीण शमिता शेट्टीला सोशल मीडियावर खूप ट्रोल केली जात आहे. काही ट्रोलर्स शमिताला तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर ‘म्हातारी शेट्टी’, ’50 वर्षांची अविवाहित वृद्ध महिला’ अशा अश्लील कमेंट करून त्रास देत आहेत. वय आणि रिलेशनशिप स्टेटसबाबत सतत ट्रोल झाल्यानंतर शमिता शेट्टीने आता याविरोधात आवाज उठवला आहे. तिच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर ट्रोलचा स्क्रीनशॉट शेअर करून तिने या ट्रोलरला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

ट्रोलरने लिहिले आहे की, “म्हातारी, शेट्टी, 50 वर्षे झाली पण एकही माणूस सापडला नाही.” शमिताच्या उत्तरावरून ही ट्रोल करणारी महिला असल्याचे दिसते. या ट्रोलचा स्क्रीनशॉट शेअर करताना शमिताने एक लांबलचक नोट देखील लिहिली आहे, या नोटमध्ये तिने युजरची शाळा घेतली आहे आणि म्हटले आहे की, “मला या प्रेमळ महिलेला उत्तर देण्यासाठी वेळ काढायचा आहे, जी लग्न न केल्यामुळे, एका स्त्रीला कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्या माहितीसाठी, तुमचे अभिनंदन, तुमचे मिशन अयशस्वी झाले.”

शमिताने पुढे लिहिले की, “माझ्या आयुष्याचे एकमेव ध्येय लग्न, हे नाही! मला जीवनात आनंद, समाधान आणि स्वातंत्र्य हवे आहे. मला आशा आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सकारात्मकता मिळेल आणि मला आशा आहे की तुम्ही कधीही दुसऱ्या स्त्रीला कमी लेखण्याचा प्रयत्न करू नका आणि तुमच्याकडे लोकांना सांगण्यासारखं काही चांगले नसेल, तर तुमच्यासाठी गप्प राहणेच योग्य ठरेल.”

बिग बॉसनंतर शमिताने राकेश बापटला काही काळ डेट केले होते. बिग बॉस ओटीटीच्या घरात दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. पण, बिग बॉस संपल्यानंतर काही महिन्यांनी दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. तिने तिच्या ब्रेकअपची माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली होती.