महिला मग त्या नोकरी करणार्या असोत वा घरात बसणार्या म्हणजे होममेकर असोत.त्यांना रात्रंदिवस काम करण्यावाचून पर्याय नसतो कारण घरादाराची, मुलाबाळांची जबाबदारी त्यांच्यावर असते. नोकरी करणार्या महिलांना कार्यालयात काम करावे लागते तसेच घरातही करावे लागते. अनेकदा अतिताणामुळे स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ मिळत नाही व कांही होत असेल तर कामे पार पाडताना ती व्यवस्थित होऊ शकत नाहीत. अर्थात यातूनही मार्ग काढता येतो, कसा ते या कांही टिप्स फॉलो केल्यात तर समजेल.
महिलांसाठी कांही खास टीप्स
फिटनेस- कामाचा ताण कितीही असला तरी आपल्या फिटनेसकडे लक्ष देणे हे आपले सर्वात पहिले व महत्त्वाचे काम आहे याचा विसर पडू देऊ नये. रेाजचे रूटीन काम म्हणजे एक्झर्शन असते. तो व्यायाम किंवा एक्सरसाईज नसतो हे अगोदर मान्य करावे व स्वतःसाठी सकाळी अर्धा तास वेळ काढून मोकळ्या हवेत फिरून यावे. यातूनच दिवसभराच्या कामासाठी लागणारी उर्जा आपण मिळवू शकतो. कामातून थोडा मोकळा वेळ मिळाला तर योगासनांचे कांही प्रकार अथवा जिममध्ये जाऊन थोडा व्यायाम करण्यानेही फ्रेश राहण्यास मदत मिळते. नियमित व्यायामाने मेंदूतून फिलगुड हार्मोन रिलीज होते ज्यामुळे आपण शारिरीकच नाही तर मानसिक दृष्ट्याही उत्साही राहतो.
पेहराव- आजकाल नोकरदार अथवा घरकाम करणार्या महिलांना आधुनिक राहणीमान आवडते. त्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे आपला पेहराव. आपण नुसत्या कपड्यातून मॉडर्न किंवा अधुनिक बनू शकत नाही तर त्यासाठी विचारही आधुनिक असायला हवेत. त्यामुळे आपले कपडे निवडताना ते प्रेझेंटेबल असावेत याला महत्त्व द्यावे. कपडे भारी का स्वस्त हा प्रश्न मनात येऊ न देता आपल्याला शोभतील व मुख्य म्हणजे आरामदायी असतील असे कपडे निवडावेत. साध्या कपड्यातही टापटीप दिसता येते हे लक्षात घ्यावे. आपल्या देशातील हवामान लक्षात घेऊन त्याला अनुरूप कपडे घालावेत तसेच वयाचा विचारही त्यात असावा. सिंपल पण सोबर कपडे जादा प्रमाणात वापरात ठेवावेत.
ज्ञान- आपल्या भोवतीच नाही तर जगातही काय चाललेय याची माहिती आपण अवश्य करून घ्यायला हवी. कारण यातून मिळणारे ज्ञान आपला आत्मविश्वास वाढविते व त्यातून मिळणारा आनंद वेगळा असतो. शिवाय चार लोकांत गेल्यास आपण संभाषणातून वेगळे पडत नाही व सगळ्यात मिसळता आल्याने आपला वेळ आनंदात घालविता येतो.
वेळ सत्कारणी लावा- आपला वेळ सत्कारणी व चांगल्या कामासाठी द्यायला शिका. चांगले साहित्य वाचन, एखादा छंद जोपासणे, मनोरंजन कार्यक्रमांचा आस्वाद जरूर घ्यावा. मित्र मैत्रणी जोडाव्या, ग्रुप बनवावे व कांही तरी नवीन सतत शिकण्याचा प्रयत्न करत राहावा. यामुळेही तुम्ही फ्रेश राहताच पण दिवसभर झालेली दमणूक अशा छंदातून कमी करता येते.
त्वचा व केस- वय कितीही असले व आपण नोकरीवर जात नसलो तरीही महिलांनी आपले केस व त्वचेची काळजी घ्यायलाच हवी. चांगला हेअरकट, चमकदार त्वचा आपले व्यक्तीमत्त्व केवळ आकर्षक नाही तर प्रेझेंटेबल बनवते. त्यासाठी भरपूर पाणी पिणे, आहारात फळांचा समावेश असायला हवा. ताण तणाव वाढताहेत असे लक्षात आले की आपल्या समस्या जिवलग मैत्रिणीबरोबर शेअर करा त्यामुळेही मोकळे वाटते. तसेच आपल्या मुलांबरोबर खेळा, त्यांच्यासोबत हास्यविनोद करा, विकएंडला बाहेर आऊटिंगला जा, एखादा चांगला चित्रपट पहा. त्यामुळेही ताजेतवाने वाटते व रोजच्या व्यापातून थोडी मोकळीक मिळाली की पुढचा आठवडा पुन्हा राबण्यासाठी शरीर व मन तयार राहते.
कधीतरी गेट टुगेदरसारखा कार्यक्रम ठरवा. कुकींग टिप्स शेअर करा किंवा नवीन रेसीपी शिका. महिलांना नवीन रेसिपीज शिकण्याची आवड जात्याच असते व नवीन काहीतरी करून ते घरच्या मंडळींना खिलविण्यात त्यांना मोठा आनंदही मिळतो हे लक्षात असू द्या.