अक्षय कुमारच्या पुढील चित्रपटाचे नाव असेल ‘सरफिरा’ , फर्स्ट लूकसोबतच समोर आली रिलीज डेटही


अक्षय कुमारने त्याच्या आणखी एका चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव सरफिरा आहे. शीर्षकाची घोषणा करण्यासोबतच अक्षय कुमारने चित्रपटाची झलकही दाखवली. हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुधा कोंगारा दिग्दर्शित करत आहेत. हा दक्षिण अभिनेता सूर्याचा सुपरहिट चित्रपट सोरारई पोटरुचा हिंदी रिमेक आहे.

अक्षय कुमारने सुर्यासोबत इंस्टाग्रामवर चित्रपटाच्या शीर्षकाची घोषणा केली आणि चित्रपटाचा फर्स्ट लुकही जारी केला. फर्स्ट लूक व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिले की, “जर तुम्ही मोठे स्वप्न पाहिले, तर ते तुम्हाला वेडा म्हणतील. सरफिरा 12 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. #मारउडी.”


चित्रपटाच्या फर्स्ट लूक व्हिडिओमध्ये कोणताही संवाद नाही. यामध्ये केवळ अक्षय कुमारचा लूक समोर आला आहे. व्हिडिओमध्ये अक्षय कुमार बाईक चालवताना दिसत आहे आणि तेही हँडल न धरता. पुढच्या सीनमध्ये अक्षय कुमार विमानतळावर उभा असलेला दिसतो आणि त्याने एव्हिएशन स्टाफचा गणवेश घातला आहे.

सुधा कोंगारा यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटात अक्षय कुमारशिवाय राधिका मदन, परेश रावल आणि सीमा बिस्वास हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट सुधा आणि शालिनी उषादेवी यांनी एकत्र लिहिला आहे. त्याचे संवाद लिहिण्याचे काम पूजा तोलानी यांनी केले आहे.

अक्षय कुमारचा सरफिरा हा सूर्याच्या सोरारई पोटरुचा रिमेक आहे. 12 नोव्हेंबर 2020 रोजी सोरारई पोटरु चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शनही सुधा कोंगारा यांनी केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला. हा चित्रपट एका माणसावर आधारित होता, ज्याला सर्वसामान्यांसाठी स्वस्त विमानसेवा उपलब्ध करून द्यायची होती. निर्मात्यांच्या मते, अक्षय कुमारचा सरफिरा देखील स्टार्टअप्स आणि एव्हिएशनवर आधारित असेल.