चौथी कसोटी, चौथा क्रमांक आणि असे करणारा चौथा फलंदाज… रचिन रवींद्रने द्विशतक झळकावून रचला इतिहास


दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा युवा फलंदाज रचिन रवींद्रने इतिहास रचला आहे. त्याने पहिल्या डावात द्विशतक झळकावून इतिहास रचला. यासाठी रचिन रवींद्रचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. 25 महिन्यांनंतर कसोटीत पुनरागमन करणे आणि नव्या फलंदाजीच्या क्रमाने तिहेरी आकड्याच्या धावा करणे सोपे नाही. पण, रचिनने हे काम चोख बजावले. संघाचा त्याच्यावर असलेला विश्वास आणि त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची मिळालेली संधी या दोन्ही गोष्टी तो खरा ठरला. त्याच्या द्विशतकाचा परिणाम म्हणजे न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीच्या पहिल्या डावात 511 धावा केल्या आहेत.

रचिन रवींद्रने 366 चेंडूंचा सामना करत 26 चौकार आणि 3 षटकारांसह 240 धावा केल्या. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ही पहिलीच मोठी धावसंख्या आहे. याचा अर्थ, ही सर्वात मोठी धावसंख्या आहे, जी चौथ्या कसोटीतच त्याच्या बॅटमधून दिसली. याआधी खेळल्या गेलेल्या 3 कसोटीत रचिन रवींद्रने केवळ 73 धावा केल्या होत्या. अशाप्रकारे 4 कसोटी सामन्यांच्या 7 डावांनंतर त्याच्या एकूण धावा आता 313 धावा झाल्या आहेत.


दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी शतक झळकावल्यानंतर नाबाद राहिलेल्या रचिनने दुस-या दिवशीच्या खेळाचे दुहेरी शतकात रूपांतर केले. यासह, आपल्या पहिल्या शतकाचे दुहेरी शतकात रूपांतर करणारा तो न्यूझीलंडचा चौथा फलंदाज ठरला आहे. एकूणच, या कसोटीत त्याच्यासाठी आत्तापर्यंत चौथा क्रमांक लकी ठरला आहे. चौथ्या कसोटीत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याचे द्विशतक झाले आणि, आता आपल्या पहिल्या शतकाचे दुहेरी शतकात रूपांतर करणारा तो चौथा किवी खेळाडू बनला आहे.

रचिन रवींद्रने 240 धावांच्या डावात केवळ द्विशतकच केले नाही, तर काही उत्कृष्ट भागीदारीही केली. रचिनने केन विल्यमसनसोबत तिसऱ्या विकेटसाठी 232 धावा, चौथ्या विकेटसाठी डॅरिल मिशेलसोबत 103 धावा आणि सहाव्या विकेटसाठी ग्लेन फिलिप्ससोबत 82 धावांची भागीदारी केली.