Video : श्रेयस अय्यरने माघारी धाव घेतली, लांब डाईव्ह आणि घेतला जबरदस्त झेल, असा फिरवला सामना


इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या काही खेळाडूंनी फलंदाजीच नाही, तर क्षेत्ररक्षणातही निराशा केली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातही या उणिवा दिसून आल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यातही हेच चित्र दिसून आले. असे असले तरी टीम इंडियाच्या एका खेळाडूने या बाबतीत वेगळेपण दाखवले आणि हा खेळाडू म्हणजे श्रेयस अय्यर. विशाखापट्टणम कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडिया विकेटच्या शोधात असताना अय्यरने आपल्या क्षेत्ररक्षणाने जबरदस्त योगदान दिले.

विशाखापट्टणम येथील कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी श्रेयस अय्यरला मोठी खेळी करता आली नाही. त्याने चांगली सुरुवात केली आणि बराच वेळ क्रीजवर राहिला, पण तरीही त्याला मजबूत धावसंख्या उभारता आली नाही. त्याला केवळ 27 धावा करता आल्या. अशा परिस्थितीत त्याच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, परंतु अय्यरने आपल्या क्षेत्ररक्षणावर त्याचा परिणाम होऊ दिला नाही आणि या आघाडीवर खेळ बदलण्यात योगदान दिले.


कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्रॉलीने शानदार फलंदाजी केली. जसप्रीत बुमराहच्या एकाच षटकात त्याने 4 चौकार मारले, तर कुलदीप यादवच्या षटकात एक षटकार आणि एक चौकारही लगावला. त्याच्या वाढदिवशी क्रॉली शतकाच्या दिशेने वाटचाल करत होता, पण पुढे सरकत अक्षर पटेलच्या चेंडूवर फटका खेळण्याची चूक केली. बॅटची धार घेत, चेंडू हवेत डीप पॉईंटकडे गेला, जिथे बॅकवर्ड पॉईंटवरून 14 मीटर वेगाने धावत अय्यरने नेत्रदीपक डाईव्ह टाकून आश्चर्यकारक झेल घेतला.

अय्यरने हा झेल घेताच संपूर्ण भारतीय संघ त्याच्याकडे धावला आणि त्याला मिठी मारली. या झेलने इंग्लंडच्या धावांच्या गतीवरच अंकुश ठेवला नाही तर टीम इंडियाचे येथून पुनरागमनही केले. या विकेटपूर्वी इंग्लंडची धावसंख्या 1 विकेटवर 114 धावा होती. यानंतर पुढील 22 धावांत इंग्लंडने आणखी 2 विकेट गमावल्या. जसप्रीत बुमराहने आधी जो रूटला पायचीत केले आणि नंतर ऑली पोपला सनसनाटी यॉर्कर टाकला.