Bhakshak Trailer : बिहारच्या भीषण घटनेवर आधारित ‘भक्षक’चा ट्रेलर पाहून सुन्न होईल तुमचे मन


बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या आगामी ‘भक्षक’ चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. भूमीचे यापूर्वीचे अनेक चित्रपट एकापाठोपाठ एक फ्लॉप ठरले आहेत. अशा परिस्थितीत आता तिच्या चाहत्यांना ‘भक्षक’कडून खूप अपेक्षा आहेत. निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. रिलीज होताच सर्वत्र ‘भक्षक’च्या ट्रेलरचीच चर्चा होत आहे. बिहारमधील भीषण घटनेवर आधारित या चित्रपटात भूमी एका धारदार पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘भक्षक’मध्ये भूमी पेडणेकरची व्यक्तिरेखा एका शोध पत्रकाराची असणार आहे. जी आपल्या समजुतीने आणि मनाने न्यायासाठी लढताना दिसणार आहे. ज्यामध्ये संजय मिश्राही तिला सपोर्ट करताना दिसणार आहे. या चित्रपटात आदित्य श्रीवास्तव आणि सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटाची कथा बऱ्याच अंशी स्पष्ट होते. ट्रेलरमध्ये भूमी बालिकागृहात मुलींवर होत असलेल्या जघन्य गुन्ह्यांचे सत्य सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

सत्याच्या लढाईत भूमीला तिच्या जीवाचीही पर्वा नाही. ‘भक्षक’चा ट्रेलर पाहिल्यानंतर 2018 मध्ये बिहारमधील मुझफ्फरपूर शेल्टर होम बलात्कार प्रकरणाची कहाणी लक्षात येते. ट्रेलरमध्ये भूमीचा बिहारी ॲक्सेंटही पाहायला मिळतो. पुलकितने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्याचवेळी दिग्दर्शक ‘भक्षक’बद्दल सांगतात की, ही कथा केवळ बिहारच्या मुझफ्फरपूर शेल्टर होम बलात्कार प्रकरणाची नाही, तर देशात घडणाऱ्या अशा अनेक घटना दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे.

शाहरुख खान आणि गौरी खानच्या प्रॉडक्शन हाऊस रेड चिलीजच्या बॅनरखाली भूमी पेडणेकरचा ‘भक्षक’ बनला आहे. त्याचबरोबर या चित्रपटाची निर्मिती गौरव वर्मा आणि गौरी खान यांनी केली आहे. सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीजसाठी सज्ज आहे.