दीपिका पादुकोणने मोडला रेकॉर्ड, बनली सर्वाधिक 100 कोटीचे चित्रपट देणारी अभिनेत्री


2023 मध्ये ‘जवान’ आणि ‘पठाण’ सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर आता दीपिका पादुकोणने 2024 वर्षाची धमाकेदार सुरुवात केली आहे. 25 जानेवारीला तिचा ‘फायटर’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ती ऋतिक रोशनसोबत दिसली आहे. दीपिका आणि ऋतिकने पहिल्यांदाच ‘फायटर’ सिनेमातून स्क्रीन शेअर केली आहे. पहिल्यांदाच एकत्र आलेल्या या जोडप्याला लोकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. या ॲक्शनपटाने चार दिवसांत 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. दीपिकाचा हा पहिलाच चित्रपट नाही, ज्याने अल्पावधीतच 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. याआधीही तिच्या अनेक चित्रपटांनी अशीच कमाई केली होती.

दीपिका पादुकोण ही बॉलीवूडची सर्वाधिक 100 कोटींची कमाई करणारी अभिनेत्री बनली आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. या प्रकरणात तिने कतरिना कैफलाही मागे टाकले आहे. गेल्या वर्षी आलेल्या ‘पठाण’ या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत 100 कोटींचा टप्पा ओलांडला होता, यावरून याचा अंदाज येतो. यामध्ये दीपिका शाहरुख खानसोबत दिसली होती. हा तिचा 9वा 100 कोटींचा चित्रपट होता.

त्याचबरोबर ‘टायगर 3’ सोबत कतरिनाचे 9 चित्रपटही 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत. पण, आता दीपिकाने कतरिनाला मागे टाकले आहे, कारण तिच्या ‘फायटर’नेही 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. अशा प्रकारे तिच्याकडे आता 10, 100 कोटींचे चित्रपट आहेत. त्यामुळे आता दीपिका पादुकोण भारतीय बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक 100 कोटींची कमाई करुन देणारी अभिनेत्री बनली आहे.

दीपिकाच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की 2898 एडी’ या साऊथ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती साऊथचा सुपरस्टार प्रभाससोबत स्क्रीन शेअर करणार आहे. याशिवाय रोहित शेट्टीचा ‘सिंघम अगेन’ हा चित्रपटही याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होऊ शकतो. याशिवाय ती हॉलिवूड चित्रपट ‘द इंटर्न’च्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार आहे.