Video : काय म्हणावे पाकिस्तानला ! गोलंदाजाने अपीलही केले नाही, अंपायरने देऊन टाकले आऊट


पाकिस्तानात रोज काही ना काही अराजकता घडते. मग ते या देशाबद्दल असो किंवा देशाच्या क्रिकेट बोर्डाबाबत. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच PCB. PCB हे जगातील एकमेव क्रिकेट बोर्ड आहे, ज्यात दर दोन महिन्यांनी व्यवस्थापन आणि कर्मचारी बदलत असतात. त्याचबरोबर पाकिस्तानमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-20 लीगचीही अवस्था वाईट आहे. सिंध प्रीमियर लीग सध्या पाकिस्तानमध्ये खेळली जात आहे आणि या लीगच्या एका सामन्यात असे काही घडले आहे, ज्यामुळे जगभरात पाकिस्तान क्रिकेटची खिल्ली उडवली जात आहे.


सिंध प्रीमियर लीगच्या एका सामन्यात अंपायरचे विचित्र वर्तन समोर आले आहे. या लीगच्या एका सामन्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बॉलरचा एक बॉल थेट बॅट्समनच्या पॅडवर आदळल्याचे दिसून येते. चेंडू डाऊन द लेग असेल तर LBW ची शक्यता नसते. त्यामुळे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने अपील करण्यात रस दाखवला नाही. पण इथे अंपायरने सर्वांना चकित करत बोट वर केले आणि फलंदाजाला आऊट दिले. अंपायरच्या या कृतीवर फलंदाजाचाही विश्वास बसला नाही आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमलाही हसू आले. पण प्रत्यक्षात अंपायर मस्करी करत नसल्याने फलंदाजाला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

सिंध प्रीमियर लीगच्या व्यवस्थापनात पाकिस्तानी क्रिकेटमधील अनेक मोठी नावे सामील आहेत. या लीगचे उपाध्यक्ष जावेद मियांदाद आहेत. या लीगने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला आपला ब्रँड ॲम्बेसेडर बनवले आहे. अब्दुल रझाक हा मेंटॉर म्हणून व्यवस्थापनात गुंतलेले आहे. मात्र असे असतानाही लीगमधील अंपायरिंगच्या या पातळीमुळे पाकिस्तान क्रिकेटला पुन्हा एकदा जगभरात प्रसिद्धी मिळत आहे.