Monkey Man Trailer : अॅनिमलपेक्षा दमदार अॅक्शन! मंकी मॅनचा ट्रेलर पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर उभे राहतील काटे


ऑस्कर नामांकित अभिनेता देव पटेलचा आगामी चित्रपट ‘मंकी मॅन’ बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता. देव पटेल यानीही या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. दरम्यान, ‘मंकी मॅन’चा ट्रेलरही रिलीज झाला आहे. जो रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. ‘मंकी मॅन’च्या ट्रेलरची सर्वत्र चर्चा होत असून त्याला युजर्सचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. या ट्रेलरमध्ये ॲक्शनमध्ये कोणतीही कमतरता नाही.

बॉलिवूड अभिनेत्री शोभिता धुलिपाला देखील या चित्रपटाद्वारे हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मॉडेलिंग, साऊथ, बॉलीवूड आणि ओटीटीमध्ये चमक दाखवल्यानंतर आता शोभिता हॉलिवूडमध्ये धमाल करायला सज्ज झाली आहे. ‘स्लमडॉग मिलेनियर’ फेम देव ‘मंकी मॅन’मधून दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात करत आहे. इतकेच नाही, तर या चित्रपटाची कथा त्याने सहलेखक म्हणून लिहिली असून जॉर्डन पीलेसोबत त्याची सहनिर्मितीही केली आहे. देव आणि शोभिता यांच्याशिवाय या चित्रपटात अनुपम खेर यांचा मुलगा सिकंदर खेर, विपिन शर्मा, आदिती कुलकांते, ब्राहिम चाब, नागेश भोसले यांच्याही भूमिका आहेत.

ट्रेलरच्या कथेबद्दल सांगायचे तर, यात एका मुलाचा समावेश आहे, ज्याला त्याच्या लहानपणी त्याच्या आईने एक गोष्ट सांगितली होती. त्या कथेत एका वानराचा उल्लेख केला असतो, ज्याची प्रतिमा रामभक्त हनुमानाची आहे. जो दुर्बलांना आधार देत असे. ट्रेलरची कथा श्रीमंती आणि गरिबीभोवती फिरणारी दिसते. ट्रेलरमध्ये शोभिताची एन्ट्री एका बारमध्ये डान्स करताना दाखवण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये अंडरग्राउंड फाईट क्लबही दाखवण्यात आला आहे. ज्यामध्ये देव माकडाचा मुखवटा घालून लढताना दाखवला आहे.

ट्रेलरमधील काही अॅक्शन इतक्या दमदार आहेत की त्या तुम्हाला वाह म्हणायला लावतील. हा चित्रपट 5 एप्रिल 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. युनिव्हर्सल पिक्चर्सतर्फे ‘मंकी मॅन’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. शोभिताबद्दल सांगायचे तर, या चित्रपटानंतर ती आलिया भट्टसोबत जिगरामध्ये दिसणार आहे. ‘मेड इन हेवन 2’ या वेब सीरिजमधून शोभिताला खूप प्रसिद्धी मिळाली.