जसप्रीत बुमराहने केपटाऊनमध्ये केला कहर, दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ एकट्याने माघारी धाडला


मोहम्मद सिराजनंतर जसप्रीत बुमराहने केपटाऊनच्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आणले. या उजव्या हाताच्या गोलंदाजाने दुस-या दिवसाच्या पहिल्या सत्रात धुमाकूळ घातला आणि पाच बळींचा टप्पा पूर्ण केला. बुमराहने पहिल्या सत्रात चार फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. खेळाच्या पहिल्या दिवशी शेवटच्या सत्रात त्याने एक विकेट घेतली होती.


जसप्रीत बुमराहने 9व्यांदा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याची गोलंदाजीची सरासरी केवळ 21.24 आहे, जी खरोखरच आश्चर्यकारक आहे. बुमराहला दक्षिण आफ्रिकेची माती खूप आवडते, कारण येथेच त्याने त्याच्या नावावर सर्वाधिक 3 वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये त्याने दोनदा एका डावात पाच बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारतात एकदाच त्याने हा पराक्रम केला आहे.


जसप्रीत बुमराहने प्रथम ट्रिस्टन स्टब्सला दुसऱ्या डावात राहुलच्या हातून झेलबाद केले. दुसऱ्या दिवशीच त्याने बेडिंगहॅमला पहिल्याच षटकात राहुलकडे झेलबाद करण्यात यश मिळविले. यानंतर बुमराहने लय पकडत काइल व्हेरिन आणि मार्को यानसनचे विकेट्स घेतले. सरतेशेवटी, केशव महाराजला बाद करून त्याने कसोटी क्रिकेटमधील 9व्यांदा पराक्रम पूर्ण केला. बुमराहने 6 वर्षांपूर्वी केपटाऊनमधील न्यूलँड्स मैदानावर पदार्पण केले होते.

जसप्रीत बुमराहने केपटाऊनमध्ये पाच विकेट घेत जवागल श्रीनाथच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. श्रीनाथने दक्षिण आफ्रिकेत तीन वेळा एका डावात पाच बळी घेण्याचा विक्रम केला होता, आता बुमराह त्याच्या जागी पोहचला आहे.