ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूवर आयसीसीची कारवाई, सांगितलेले मान्य न केल्यामुळे फटकारले


ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये सुरू होत आहे. या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. ही कसोटी मालिका मैदानावरील कृतीसह वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे आणि याचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेशी वादात सापडलेला ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज उस्मान ख्वाजा. या संघर्षामुळे आता आयसीसीने त्याच्यावर कारवाई केली आहे.

दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना 14 डिसेंबरपासून सुरू झाला. हा सामना सुरू होण्यापूर्वीच उस्मान ख्वाजा त्याच्या एका कृतीमुळे चर्चेत आला होता. वास्तविक, ख्वाजाने कसोटी सुरू होण्यापूर्वी सराव सत्रादरम्यान आपल्या शूजवर संदेश लिहिला होता – ‘ऑल लाइव्ह मॅटर’ म्हणजेच ‘प्रत्येकाचे जीवन महत्त्वाचे आहे.’ ख्वाजा यांचा हा संदेश गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धासंदर्भात होता, जिथे इस्रायलच्या हमासविरुद्धच्या लष्करी कारवाईत हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.


जेव्हा आयसीसीने ख्वाजाच्या या कृतीची दखल घेतली, तेव्हा त्यांनी त्याला तसे करण्यास बंदी घातली. सामन्यादरम्यान ख्वाजाने कोणत्याही प्रकारचा राजकीय संदेश दिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश आयसीसीने दिले होते. ख्वाजाने ते चुकीचे असल्याचे सांगत स्वत:चे स्पष्टीकरण मांडले होते. ऑस्ट्रेलियन फलंदाजाने सांगितले होते की, नियमांमुळे तो तसे करणार नाही, पण त्याच्याच शैलीत निषेध नोंदवेल.


त्यानंतर ख्वाजाने पर्थ कसोटीदरम्यान आपल्या जर्सीवर काळी पट्टी बांधून निषेध नोंदवला. आता ख्वाजाच्या या ‘कृती’वर आयसीसीनेही कारवाई केली आहे. मेलबर्न येथे होणाऱ्या ‘बॉक्सिंग टेस्ट’पूर्वी आयसीसीने ख्वाजाला अधिकृतरीत्या फटकारले आणि त्याची पुनरावृत्ती न करण्याचा इशारा दिला. आता त्याने पुन्हा असे काही केले तर आयसीसी त्याच्यावर दंड आकारू शकते आणि डिमेरिट पॉईंटही देऊ शकते. आयसीसीच्या या कारवाईवर ख्वाजाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.