राहुल द्रविडच्या मुलाची कमाल, खेळली दमदार खेळी आणि संघाला मिळवून दिला मोठा विजय, पण करू शकला नाही हे विशेष काम


भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची गणना जगातील महान फलंदाजांमध्ये केली जाते. द्रविडने आपल्या फलंदाजीने टीम इंडियासाठी अनेक सामने जिंकवून दिले आहेत. तो द वॉल म्हणून ओळखला जात असे. म्हणजे द्रविड टिकला, तर त्याला आऊट करणे अवघड होते. आता द्रविडच्या थोरल्या मुलानेही त्याचा मार्ग अनुसरला आहे. द्रविडचा मोठा मुलगा समित याने कूचबिहार ट्रॉफीमध्ये शानदार खेळी खेळली आणि त्याचा संघ कर्नाटकला जम्मू-काश्मीरविरुद्ध विजय मिळवून दिला. समितचे शतक हुकले असले, तरी त्याची खेळी संघाला विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरली.

जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या (जेकेसीए) मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात कर्नाटकने एक डाव आणि 130 धावांनी सामना जिंकला. कर्नाटकने प्रथम फलंदाजी करताना पाच गड्यांच्या मोबदल्यात 480 धावांवर डाव घोषित केला. जम्मू-काश्मीरचा संघ पहिल्या डावात 170 धावांत सर्वबाद झाला होता. यानंतर कर्नाटकने त्यांना फॉलोऑन दिला, पण दुसऱ्या डावातही जम्मू-काश्मीरचा संघ काही विशेष करू शकला नाही आणि 180 धावांत सर्वबाद झाला.

कर्नाटकच्या या विजयात समितचा मोठा वाटा होता. त्याने कार्तिकेय केपीसोबत उत्कृष्ट भागीदारी केली आणि संघाला मोठी धावसंख्या गाठण्यास मदत केली. कार्तिकेयने 175 चेंडूंत 21 चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 163 धावा केल्या. मात्र समितला शतक झळकावता आले नाही. त्याने 159 चेंडूत 98 धावांची खेळी खेळली. आपल्या डावात या उजव्या हाताच्या फलंदाजाने 13 चौकार आणि एक षटकार लगावला. घृव प्रभाकरने 66 धावांची नाबाद खेळी आणि धीरजने 51 धावांची नाबाद खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. समितने आपल्या डावाने संघाचा ताबा घेतला आणि बाकीच्या फलंदाजांना मोकळेपणाने खेळण्याचे स्वातंत्र्य दिले. याशिवाय समितने गोलंदाजीतही कमाल केली आणि दोन बळी घेतले.

राहुल द्रविडचा धाकटा मुलगा अनन्या द्रविडही देशांतर्गत क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत आहे. अनन्या सध्या विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये कर्नाटककडून खेळत असून तो शानदार फलंदाजी करत आहे. द्रविड हे टीम इंडियाचे प्रशिक्षक असून गेल्या दोन वर्षांपासून तो संघात व्यस्त आहे, मात्र जेव्हाही त्याला संधी मिळते, तेव्हा तो आपल्या मुलांचे सामने पाहायला जातो. अलीकडेच विश्वचषकानंतर राहुल द्रविडचा एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यात तो आपल्या पत्नीसोबत मुलाचा सामना पाहण्यासाठी गेला होता.