दक्षिण आफ्रिकेने 24 तासांत गमावले 2 एकदिवसीय सामने, हा ठरला मोठा विक्रम


दक्षिण आफ्रिकेच्या संघाला त्याच्याच घरच्या मैदानावर पराभूत करणे खूप कठीण मानले जाते, परंतु या संघाने 24 तासात घरच्या मैदानावर दोन सामने गमावले. दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा पहिला पराभव जोहान्सबर्गमध्ये झाला आणि दुसरा पराभव 957 किलोमीटर दूर पूर्व लंडनमध्ये झाला. आश्चर्यचकित होऊ नका, खरे तर शनिवार आणि रविवारी दक्षिण आफ्रिकेचा पुरुष आणि महिला संघ दोन्ही वाईटरित्या पराभूत झाला, जे खरोखरच धक्कादायक होते. जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष संघाचा टीम इंडियाने 8 विकेट्सने पराभव केला, तर महिला संघाचा पूर्व लंडनमध्ये बांगलादेशकडून दुसरा सामना हरला. बांगलादेशच्या महिला संघाने हा सामना 119 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला.

जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेला पहिला पराभव स्वीकारावा लागला. टीम इंडियाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आणि भारताच्या दोन वेगवान गोलंदाजांनी एडन मार्करामच्या संघाला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ 27.3 षटकेच मैदानावर राहू शकला आणि त्याची धावसंख्या केवळ 116 धावा होती. अर्शदीप सिंगने 5, तर आवेश खानने 4 बळी घेतले. यानंतर टीम इंडियाच्या फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. ऋतुराज गायकवाड पाच धावा करून बाद झाला असला, तरी यानंतर साई सुदर्शनने नाबाद 55 आणि श्रेयस अय्यरने 52 धावा करत टीम इंडियाला मोठा विजय मिळवून दिला.


दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाला पूर्व लंडनमध्येही दारूण पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत 250 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ 131 धावांवर गडगडला. बांगलादेशची फलंदाज मुर्शिदा खातूनने नाबाद 91 धावा केल्या, तर गोलंदाजीत नाहिदा अख्तरने 3 बळी घेतले. बांगलादेश संघाने प्रथमच दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले आहे. गेल्या 8 सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता.