अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका, करत होता ‘वेलकम टू द जंगल’चे शूटिंग


रोहित शेट्टीच्या गोलमाल फ्रँचायझी आणि शाहरुख खानच्या ओम शांती ओमसह अनेक चित्रपटांमध्ये काम केलेला अभिनेता श्रेयस तळपदेबद्दल एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. तो शूटिंग संपवून घरी परतल्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला मुंबईतील बेलेव्ह्यू रुग्णालयात नेण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, तो सध्या निरीक्षणात असून त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. हे प्रकरण फारसे गंभीर नसले, तरी तो देखरेखीखाली असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तो वेलकम टू द जंगल या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत होता. त्याने दिवसभर चित्रपटाचे शूटिंग केले. सेटवरही तो विनोद करत राहिला. त्याने अॅक्शन सीन्सही शूट केले. दिवसभर शूटिंग करून, जेव्हा तो घरी गेला, तेव्हा त्याची तब्येत बरी नव्हती, त्यानंतर त्याच्या पत्नीने त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेले. आता डॉक्टरांनी त्याला दोन दिवस निरीक्षणात राहण्यास सांगितले असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्याची प्रकृती सुधारल्यास शुक्रवारीही त्याला डिस्चार्ज मिळू शकतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, अभिनेत्याच्या टीमने याबाबत अद्याप काहीही सांगितलेले नाही.

वेलकम टू द जंगल हा वेलकम फ्रँचायझीचा तिसरा हप्ता आहे, ज्याची निर्मात्यांनी काही महिन्यांपूर्वी घोषणा केली होती. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. नुकतेच अक्षयने या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. श्रेयसही शूटिंगचा एक भाग आहे. मात्र, आता त्याच्यासोबत असे काही झाले, जे आश्चर्यकारक आहे.

परेश रावल, संजय दत्त, सुनील शेट्टी, अर्शद वारसी, दिशा पटानी, जॅकलिन फर्नांडिस आणि रवीना टंडन हे देखील या चित्रपटाचा एक भाग आहेत. हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ज्योती देशपांडे आणि फिरोज नाडियाडवाला याची निर्मिती करत आहेत, तर अहमद खान या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. मात्र, गोलमाल, ओम शांती ओम याशिवाय श्रेयस तळपदेने इक्बाल, हाऊसफुल, पोस्टर बॉईज यांसारख्या अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे.