अॅनिमलमध्ये जोरदार फायरिंग, प्रत्यक्षात कसा मिळवायचा बंदुकीचा परवाना, जाणून घ्या ऑनलाइन प्रक्रिया


‘अॅनिमल’ या चित्रपटाने प्रभावित होऊन तुम्हीही बंदूक बाळगण्याचा विचार करत असाल, तर त्याची प्रक्रिया काय आहे, ते जाणून घ्या. भारतात बंदूक बाळगणे इतके सोपे नाही, यासाठी सर्व प्रकारची पडताळणी करावी लागते. यासाठी तुम्हाला परवाना आवश्यक आहे, जो मिळवणे इतके सोपे नाही. त्याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे, ती येथे जाणून घ्या. आम्ही तुम्हाला सांगतो की, परवाना मिळवण्यासाठी कोणत्याही भारतीय नागरिकाचे वय 21 वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.

शस्त्र कायदा 1959 अन्वये जिल्हा प्रशासनाकडून परवाना घेऊन कोणतीही गरजू व्यक्ती स्वसंरक्षणासाठी शस्त्रे खरेदी करू शकते.

कोण जारी करतात परवाने?
परवाना जारी करणाऱ्यांमध्ये राज्य सरकारांच्या गृह विभाग/मंत्रालयाचा समावेश असतो. वेगवेगळ्या राज्यांमध्ये, डीएम, जिल्हाधिकारी, आयुक्त किंवा या दर्जाचा कोणताही अधिकारी परवाना जारी करू शकतो. याशिवाय पोलीस ठाणे आणि स्थानिक प्रशासनाचीही यात भूमिका असते. यासाठी तुम्हाला प्रत्येकी एक फॉर्म भरावा लागेल. त्यासाठी तुम्हाला शस्त्र का हवे आहे, तुम्हाला कोणत्या प्रकारचे शस्त्र हवे आहे. यात पिस्तूल, रिव्हॉल्व्हर किंवा रायफल, डबल बॅरलसारख्या मोठ्या बंदुकांचा समावेश आहे, अशी कारणे द्यावी लागतील.

यासाठी सर्वप्रथम तुम्हाला शस्त्र परवाना अर्ज भरावा लागेल. तुम्ही हा फॉर्म तुमच्या राज्य पोलीस विभागाच्या https://ndal-alis.gov.in/armslicence/ वेबसाइटवरून डाउनलोड करू शकता. अर्जामध्ये, तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, शिक्षण, उत्पन्नाचा स्रोत आणि तुम्हाला खरेदी करायची असलेली शस्त्रे यांची माहिती भरावी लागेल. शुल्क भरल्यानंतर अर्ज सादर करावा लागेल.

हे दस्तऐवज आहेत महत्त्वाचे

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • ओळखीचा पुरावा (जसे की आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स)
  • रहिवाशी दाखला
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • वैद्यकीय प्रमाणपत्र
  • कॅरेक्टर प्रमाणपत्र

तुमच्यावर कोणतेही गंभीर गुन्हे दाखल नसावेत, तुम्ही कोणत्याही प्रकारचे कर्ज किंवा उसणे घेतले असल्यास त्याची माहिती द्यावी लागेल.

पोलीस पडताळणी
अर्ज आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर पोलिस तुमची पडताळणी करतील. पोलिस तुमचा गुन्हेगारी रेकॉर्ड, तुमचे सामाजिक संबंध आणि तुम्ही ज्या शस्त्रासाठी अर्ज करत आहात ते वापरण्याची गरज आहे का हे तपासतील. म्हणजे हे शस्त्र तुम्हाला कशाला हवे आहे?

डीएमच्या मान्यतेने मिळू शकतो परवाना
जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर परवाना दिला जातो. यानंतर तुम्ही तेच शस्त्र खरेदी करू शकता, ज्यासाठी तुम्ही अर्ज केला होता. तुम्ही फक्त सरकारी नोंदणीकृत दुकानांमधूनच बंदुका खरेदी करू शकता. परवान्यावर कोणते शस्त्र घेतले याचा संपूर्ण तपशीलही पोलिस ठाण्यात ठेवला जातो.

शस्त्र परवाना प्रक्रिया वेळ
बंदूक परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर, प्रक्रियेस साधारणतः 3 ते 6 महिने लागतात. तुमचा अर्ज मंजूर झाल्यास, तुम्हाला परवाना जारी केला जाईल. परवाना जारी झाल्यानंतर, तुम्हाला तो तुमच्या स्थानिक पोलिस स्टेशनमधून गोळा करावा लागेल.

प्रत्येक गोळीचा द्यावा लागेल हिशोब
बंदुकीच्या परवान्यासोबतच तुम्हाला एका वर्षात किती गोळ्या वापरायच्या हेही ठरवले जाते. तुम्ही किती गोळ्या आणि कुठे खर्च करत आहात याची संपूर्ण नोंद ठेवावी लागेल. संपूर्ण माहिती द्यावी लागेल. त्यानंतरच तुम्हाला पुन्हा नवीन गोळ्या दिल्या जातात.

परवानाधारकाने शो किंवा स्वॅगसाठी गोळीबार केला किंवा लोकांमध्ये दहशत पसरवली, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. एवढेच नाही तर यासाठी परवानाधारकाला तुरुंगात जावे लागू शकते. तुम्ही वर नमूद केलेल्या या अटी व शर्तींचे पालन न केल्यास तुमचा परवाना रद्द केला जाईल आणि शस्त्रही परत घेतले जाईल.

परवाना नूतनीकरण
पूर्वी बंदुकीचा परवाना तुम्हाला 3 वर्षांसाठी दिला जात होता. मात्र आता सरकारने त्याची वैधता 5 वर्षांपर्यंत वाढवली आहे. ही वैधता संपल्यानंतर परवान्याचे पुन्हा नूतनीकरण करावे लागेल. नूतनीकरणासाठीही परवानाधारकाची पडताळणी करून परवाना शुल्क जमा करावे लागते.