लाइव्ह मॅचमध्ये अर्शदीप सिंगमुळे अंपायरला ‘इजा’, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, पाहा व्हिडिओ


बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा धावांनी पराभव केला. यासह भारताने पाच सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकली. पाचव्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ विजयी होईल असे वाटत होते, पण अर्शदीप सिंगच्या शानदार गोलंदाजीने त्यांच्याकडून विजय हिसकावून घेतला आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. मात्र, यादरम्यान अर्शदीपमुळे पंचांना इजा झाली. चेंडू थांबवण्याच्या प्रयत्नात त्याने अंपायरला दुखापत केली. यामुळे पंचांना वेदना तर झाल्याच, पण ऑस्ट्रेलियाचेही नुकसान झाले.

प्रथम फलंदाजी करताना भारताने आठ गडी गमावून 160 धावा केल्या. ऑस्ट्रेलियन संघ संपूर्ण षटके खेळून केवळ 154 धावा करू शकला आणि सामना सहा धावांनी गमावला. भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक 53 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून बेन मॅकडरमॉटने 54 धावांची खेळी खेळली.

अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 10 धावांची गरज होती. मॅथ्यू वेड समोर असल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित वाटत होता. तिसऱ्या चेंडूवर अर्शदीपने त्याला बाद केले. त्यानंतर या षटकाच्या पाचव्या चेंडूवर असे काही घडले की अंपायर वेदनेने ओरडला. पाचव्या चेंडूवर नॅथन एलिस समोर होता. अर्शदीपने राऊंड द विकेटवरून चेंडू टाकला, एलिसने समोरच्या दिशेने शॉट खेळला. शॉट खूप वेगवान होता. अर्शदीपने तो थांबवण्याचा प्रयत्न केला पण चेंडू त्याच्या हाताला लागून अंपायरच्या मांडीला लागला. अंपायरला काही काळ वेदना सुरू झाल्या, पण नंतर ते बरे झाले. पंचांना गंभीर दुखापत झाली नाही हे सुदैवच म्हणावे लागेल.


मात्र यामुळे ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला. हा चेंडू अर्शदीपच्या हाताला लागला नसता, तर थेट चौकार लागला असता. मात्र, यावर एक धाव आली. शेवटच्या चेंडूवरही अर्शदीपने केवळ एक धाव देत भारताला विजयापर्यंत नेले. या सामन्यात अर्शदीपने चार षटकात 40 धावा दिल्या आणि दोन बळी घेतले.

या सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात मुकेश कुमारचीही महत्त्वाची भूमिका होती. या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने चार षटकांत 32 धावा देत तीन बळी घेतले. रवी बिश्नोईने चार षटकांत 29 धावा देत दोन गडी बाद केले. अक्षर पटेलने किफायतशीर गोलंदाजी करत चार षटकात केवळ 14 धावा दिल्या आणि एक बळी घेतला. बॅटनेही त्याने शानदार खेळी केली. अक्षरने 21 चेंडूत 31 धावा केल्या. या खेळीत त्याने दोन चौकार आणि एक षटकार लगावला. या कामगिरीसाठी अक्षरला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.