अखेर काय आहे हे मोये मोये म्हणजे? सोशल मीडियावर उडवून दिली आहे खळबळ


सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, हे कोणालाच माहीत नाही. अनेकदा इथे वेगवेगळ्या प्रकारची गाणी आणि डान्सचे व्हिडिओ व्हायरल होतात, त्यानंतर ते ट्रेंड बनतात आणि मग त्यावर व्हिडिओ बनवण्याची प्रक्रिया सुरू होते. सध्या सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘मोये मोये’ची खूप चर्चा आहे. प्रत्येकजण त्यावर रील बनवण्यात व्यस्त आहे, परंतु सोशल मीडियावर खळबळ उडवून देणारी ही ‘मोये मोये’ काय आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?

खरं तर, हे सर्बियन गाणे आहे. खरे तर हे गाणे ‘मोये मोरे’ आहे, पण भारतात त्याचा उच्चार ‘मोये मोये’ असा केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या गाण्याची क्रेझ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म TikTok वरून सुरू झाली आणि नंतर काही दिवसांतच ते Instagram, Facebook, Twitter आणि YouTube अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर पसरले. या गाण्याने जगभरातील प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.

रिपोर्ट्सनुसार, तीन मिनिटांचे व्हायरल झालेले हे गाणे ‘मोये मोरे’ सर्बियन गायक आणि गीतकार तेया डोराने गायले आहे. या गाण्याचे खरे नाव ‘मोये मोरे’ किंवा ‘मोये मोये’ नाही आहे, तरी गाण्याचे अधिकृत शीर्षक ‘झानम’ आहे. या गाण्याचे बोल सर्बियन रॅपर स्लोबोदान वेल्कोविक यांनी कोबीच्या सहकार्याने तयार केले आहे, तर लोका जोव्हानोविकने ट्यून तयार केली होती, जी आता लोकांच्या मनात घर करून आहे. हे गाणे यूट्यूबवर 57 दशलक्ष म्हणजेच 5.7 कोटी पेक्षा जास्त वेळा पाहिले गेले आहे.

रिपोर्ट्सनुसार, सर्बियामध्ये ‘मोर’ म्हणजे ‘दुःस्वप्न’. अपूर्ण आकांक्षांच्या वेदना, निराशेमध्ये उज्ज्वल भविष्यासाठी सतत संघर्ष आणि वारंवार येणाऱ्या दुःस्वप्नांशी झुंज, सहनशील नैराश्य आणि एकटेपणाची भावना या गाण्यातून दाखवण्यात आली आहे. लोकांना या गाण्याचा अर्थ माहित नसला तरी सोशल मीडियावर मात्र खळबळ माजली आहे.