Video : ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्विंटन डी कॉकने केली अशी चूक, मैदानातच मार्करामला अश्रू अनावर


भारतात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक-2023 मधील अंतिम फेरीतील दोन संघ निश्चित झाले आहेत. 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा सामना पाच वेळा विजेत्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारताने न्यूझीलंडचा पराभव करून विजेतेपदाच्या लढतीत आपले नाव कोरले. गुरुवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना खूपच रोमांचक झाला. अथक परिश्रमानंतर ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला. या सामन्यात एक असा टप्पा होता, जेव्हा दक्षिण आफ्रिकेला वर्चस्व मिळू शकले असते आणि नंतर सामना जिंकता आला असता, पण दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकने ही संधी गमावली, जे पाहून एडन मार्करामच्या डोळ्यात अश्रू आले.

कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या उपांत्य फेरीत डेव्हिड मिलरच्या शानदार शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 213 धावा केल्या. हे लक्ष्य गाठताना ऑस्ट्रेलियालाही खूप अडचणींचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने 47.2 षटकात सात विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले आणि सामना तीन विकेट्स राखून जिंकला.


ऑस्ट्रेलियन संघ एका धावेसाठी झगडत होता. दरम्यान, कर्णधार टेम्बा बावुमाने एडन मार्करामवर विश्वास व्यक्त केला आणि या खेळाडूने आपल्या ऑफस्पिनने संघाला जवळपास विकेट मिळवून दिली होती, पण यष्टिरक्षक डी कॉकने चूक केली. 45 वे ओव्हर टाकत असलेल्या मार्करामने ओव्हरचा दुसरा बॉल राऊंड द विकेट आणि ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. हा चेंडू वळण घेत आला आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सच्या बॅटची कड घेऊन यष्टिरक्षकाकडे गेला, पण डी कॉकला तो पकडता आला नाही. डी कॉकने हा झेल सोडताच मार्करामने डोके धरले आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याचा हा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या सात गड्यांच्या मोबदल्यात 204 धावा होती. कमिन्स बाद झाला असता, तर सामना बदलला असता आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव होऊ शकला असता. कमिन्स 14 धावा करून नाबाद राहिला आणि संघाला विजयापर्यंत नेऊन परतला.

यासह दक्षिण आफ्रिकेचे पुन्हा एकदा अंतिम फेरीतील स्थान हुकले. हा संघ अद्याप एकदाही फायनल खेळलेला नाही. यावेळी 1992, 1999, 2007 आणि 2015 मध्ये उपांत्य फेरीत धडक मारलेल्या दक्षिण आफ्रिकेकडून फायनल खेळण्याची अपेक्षा होती, मात्र चोकर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संघाची पुन्हा एकदा तिच छाप उमटली. याची वेदना मार्करामच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. पराभवानंतर संपूर्ण दक्षिण आफ्रिकेचा संघ खूप निराश झाला असून खेळाडूंचे चेहरे दुःखी होते.