VIDEO : ‘रडत’ असलेल्या बाबर आझमला मिळाली विराट कोहलीची साथ, मैदानात येऊन त्याला केली मदत


विश्वचषक 2023 हा पाकिस्तानसाठी काही खास नाही. या संघाने पहिले दोन सामने जिंकले, पण पुढच्या तीन सामन्यात त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. भारत आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर अफगाणिस्तानकडूनही पराभव पत्करावा लागला. त्यामुळेच पाकिस्तान संघ आणि त्यांचा कर्णधार बाबर आझम यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. बाबरची अवस्था खूप वाईट आहे. हा खेळाडू कर्णधारपदासह फलंदाजीमध्येही आउट ऑफ फॉर्म असल्याचे दिसत आहे. बाबर आझमला हटवण्याबाबत सर्वजण बोलत आहेत. मात्र, या कठीण काळात बाबरला विराट कोहलीची साथ लाभली आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विराट कोहली आणि बाबर आझम मैदानावर बोलताना दिसत आहेत. बाबर या भारतीय दिग्गज खेळाडूला काहीतरी विचारत असून विराट कोहली त्याला काहीतरी समजावून सांगत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. बाबर विराटशी त्याच्या तांत्रिक त्रुटींबद्दल बोलत असण्याची शक्यता आहे. विराट कोहलीचा सल्ला बाबरला उपयोगी पडेल आणि त्याने शतक झळकावावे, अशी आशा पाकिस्तान क्रिकेट समर्थकांना आहे.


वर्ल्ड कप 2023 बद्दल बोलायचे झाले तर बाबर आझमने 5 सामन्यात केवळ 31.40 च्या सरासरीने 157 धावा केल्या आहेत. गंभीर बाब म्हणजे त्याचा स्ट्राईक रेट 80 पेक्षा कमी आहे. बाबरने आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेत केवळ एकच षटकार मारला आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानी कर्णधार रडू लागला होता. बाबर त्याच्या कामगिरीने दडपणाखाली आहे आणि त्याची फलंदाजी आणि कर्णधारपदाचा दृष्टिकोन संघाला त्रास देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तान संघाची सर्वात मोठी अडचण ही आहे की त्याचे टॉप 5 मधील सर्व फलंदाज सारखेच खेळत आहेत. म्हणजे या संघात इफ्तिखार अहमद वगळता कोणीही पॉवर हिटर नाही. यामुळेच चेन्नईच्या पाटा खेळपट्टीवर या संघाला अफगाणिस्तानविरुद्ध केवळ 282 धावा करता आल्या आणि नंतर ही धावसंख्या कमी पडली. याशिवाय संघाची गोलंदाजीही फॉर्मबाह्य आहे. विराटचा सल्ला बाबरला उपयोगी पडेल अशी आशा आहे. कारण त्याच्या सल्ल्यानंतर बाबरने दोन अर्धशतके झळकावली आहेत.