Video : क्रीझबाहेर होता फलंदाज, तरीही मिचेल स्टार्कने केला नाही धावबाद आणि मग फसला ऑस्ट्रेलियन संघ


नॉन स्ट्रायकरच्या बाजूला धावबाद होण्याबाबत क्रिकेटमध्ये बरेच वाद झाले आहेत. बरेच लोक म्हणतात की हे खेळाच्या भावनेच्या विरोधात आहे, तर काही लोक म्हणतात की ही गोष्ट नियमात असताना, ती का वापरली जाऊ नये. सध्या भारतात एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन केले जात असून सोमवारी असेच काहीसे घडताना दिसले. लखनौमध्ये ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात मिचेल स्टार्कने श्रीलंकेच्या फलंदाजाला अशाच पद्धतीने बाद करण्याचा प्रयत्न केला, पण स्टार्कने त्याला इशारा देऊन सोडले.

या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच षटकात स्टार्कने श्रीलंकेचा फलंदाज कुसल परेराला धोक्याचा इशारा दिला. स्टार्कने एक प्रकारे परेराला बाद करण्याची संधी सोडली.


स्टार्कने पहिल्याच षटकात परेराला इशारा दिला. षटकाचा चौथा चेंडू टाकायला निघालेल्या स्टार्कला नॉन स्ट्रायकर एंडला परेरा क्रीझच्या बाहेर गेल्याचे दिसले. अशा परिस्थितीत तो थांबला आणि परेराला इशारा दिला की पुढच्या वेळी तो चेंडू टाकण्यापूर्वी क्रीजमधून बाहेर आला, तर त्याला आऊट करु. यानंतर पाचव्या षटकातही स्टार्कने परेराला इशारा दिला.पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरही परेराने पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि स्टार्कने त्याला पुन्हा इशारा दिला. यावेळी मात्र स्टार्क थांबला तेव्हाही परेराची बॅट क्रीजमध्येच होती. यावेळी स्टार्क परेराच्या जवळून गेला आणि काहीतरी म्हणत निघून गेला.

स्टार्कने पहिल्याच षटकात परेराला बाद केले असते, तर ऑस्ट्रेलियाला विकेट मिळाली असती. परेराने पुन्हा शानदार खेळी करत अर्धशतक झळकावल्यामुळे ऑस्ट्रेलियाला नंतर या चुकीचे परिणाम सहन करावे लागले. त्याने पथुम निसांकासोबत शतकी भागीदारी केली. परेराने 78 धावांची खेळी खेळली. 27 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पॅट कमिन्सने त्याला बोल्ड केले.