पाकिस्तानी संघावर फुलांचा वर्षाव आणि ढोल-ताशाने स्वागत, हे पाहून संतापल्या शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी


शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी पाकिस्तान क्रिकेट संघाच्या शानदार स्वागताने संतापल्या आहेत. त्या म्हणाल्या की, पाकिस्तान संघाचे स्वागत करण्यासाठी नाचणे, जणू ते आपल्या शूर शहीद आणि दहशतवादाला बळी पडलेल्यांच्या मृत्यूवर नाचत आहेत. यासोबत त्यांनी बीसीसीआयलाही टॅग केले.

आयसीसी विश्वचषक 2023 साठी पाकिस्तान क्रिकेट संघ गेल्या काही दिवसांपासून हैदराबादमध्ये होता. भारताविरुद्धच्या सामन्यासाठी संघ अहमदाबादला पोहोचला आहे. गुजरातमध्ये पोहोचल्यानंतर हैदराबादहून अहमदाबादला जाताना संघ श्रीलंकेविरुद्धच्या विजयाचा आनंद साजरा करताना दिसला. अहमदाबादला पोहोचल्यावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. सामन्यापूर्वी, ते ज्या हॉटेलमध्ये राहणार आहेत, तिथे त्यांचे शाल अर्पण करुन स्वागत करण्यात आले.


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. अहमदाबादला पोहोचण्यापूर्वी पाकिस्तान संघाने विश्वचषकात विजयी घोडदौड सुरू ठेवली. अब्दुल्ला शफीक आणि मोहम्मद रिझवान यांनी शतके झळकावून पाकिस्तानला विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या गाठण्यास मदत केली.

मंगळवारी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर त्यांनी श्रीलंकेचा 6 गडी राखून पराभव केला. रिझवानने 121 चेंडूत 131 धावांची शानदार नाबाद खेळी खेळली, तर अब्दुल्ला शफीकने 113 धावा केल्या. दुसरीकडे भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध कठोर परिश्रमाने विजय मिळवला.