महाराष्ट्र सरकारने वाढवली शाहरुख खानची सुरक्षा, पठाण-जवानच्या यशानंतर येत होते धमकीचे फोन


बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या सुरक्षेत महाराष्ट्र सरकारने वाढ केली आहे. शाहरुखने राज्य सरकारकडे लेखी तक्रार केली होती की, त्याच्या पठाण आणि जवान या चित्रपटांच्या यशानंतर त्याला धमकीचे फोन येत आहेत. त्यानंतर त्याची सुरक्षा वाढवण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. शाहरुखची सुरक्षा Y+ करण्यात आली आहे.

शाहरुख खानच्या लेखी तक्रारीनंतर राज्य सरकारच्या आदेशानुसार आयजींनी व्हीआयपी सुरक्षेचे आदेश दिले असून अभिनेत्याची सुरक्षा वाढवण्यास सांगितले आहे. शाहरुख खान या सुरक्षेचे पैसे देणार आहे. म्हणजेच यासाठी त्याला सरकारला पैसे द्यावे लागतील.

2023 हे वर्ष शाहरुख खानसाठी खूप छान असणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला पठाण आणि नंतर जवान. त्याच्या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत वेगळा विक्रम केला. या दोन्ही चित्रपटांच्या यशानंतर शाहरुखने राज्य सरकारकडे केलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे की, त्याला धमकीचे फोन आले होते.

पठाण 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर अंदाजे 1050 कोटींची कमाई केली होती. त्याच्या दुसऱ्या चित्रपटाने म्हणजेच जवानने पठाणचा विक्रमही मोडला. 7 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 1100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. जवान हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. ऍटली यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

दोन ब्लॉकबस्टर दिल्यानंतर, शाहरुखकडे अजून एक चित्रपट आहे, जो यावर्षी डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. त्याचा डंकी हा चित्रपट राजकुमार हिरानी दिग्दर्शित करत आहेत. त्याचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.