या दिग्गजाने नाकारला होता करण जोहरचा ‘कुछ कुछ होता है’ चित्रपट, नंतर झाला खूप पश्चाताप


करण जोहरचा पहिला चित्रपट कुछ कुछ होता है, हा 1998 मध्ये ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटात सलमान खान, शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी दिसले होते. या चित्रपटाला आता 25 वर्षे पूर्ण होत आहेत. करण जोहरने नुकतेच एका मुलाखतीत ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाशी संबंधित एक मोठे सत्य उघड केले आहे. चित्रपटातील गाणी लिहिण्याची जवाबदारी तो जावेद अख्तर यांना सोपवणार होता, पण त्यांनी ही ऑफर नाकारली होती, असे त्याने सांगितले. मात्र, नंतर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जावेद यांना पश्चाताप झाला.

करण जोहरने पुढे सत्य उघड केले आणि सांगितले की, ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाचे शीर्षक जाणून घेतल्यानंतर जावेद अख्तर यांनी ऑफर नाकारली होती. मात्र, चित्रपटाचे प्रदर्शन आणि यश पाहून जावेद यांना पश्चाताप झाला. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.

दिग्दर्शक करण जोहरने अभिनेता चंद्रचूर सिंग आणि सैफ अली खान यांना ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातील अमनच्या भूमिकेची ऑफर देखील दिली होती, परंतु दोघांनीही हे काम करण्यास नकार दिला होता. यानंतर करणची चांगलीच निराशा झाली. त्यानंतर चंकी पांडेच्या घरी पार्टीत गेल्यावर करणने सलमान खानची तिथे भेट घेतली आणि चित्रपटाची स्क्रिप्ट जाणून घेतल्यानंतर सलमान खानने भूमिका साकारण्यास होकार दिला.

कुछ कुछ होता है या चित्रपटात फरीदा जलाल, अनुपम खेर, सना सईद, अर्चना पूरण सिंग, रीमा लागू, हिमानी शिवपुरी आणि जॉनी लीव्हर यांच्यासह इतर कलाकारही होते. हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होऊन 25 वर्षे पूर्ण करणार आहे. आजही लोकांना त्याची गाणी ऐकायला आवडतात.