Asian Games : आशियाई स्पर्धेमधील ऐतिहासिक पदकापासून टीम इंडिया एक पाऊल दूर, फक्त करायचे आहे हे काम


भारतीय महिला क्रिकेट संघ रविवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना मलेशिया विरुद्ध होता. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली आणि पावसामुळे 15 षटकात खेळल्या गेलेल्या सामन्यात दोन गडी गमावून 173 धावा केल्या. पण मलेशियाच्या डावात फक्त दोनच चेंडू टाकण्यात आले आणि पावसामुळे सामना होऊ शकला नाही. उत्तम सीडिंगमुळे भारताला उपांत्य फेरीत स्थान मिळाले. आता टीम इंडिया बांगलादेशला हरवून फायनलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करेल.

नऊ वर्षांनंतर आशियाई खेळांमध्ये क्रिकेटचे पुनरागमन झाले असले, तरी भारत प्रथमच या खेळांमध्ये सहभागी होत आहे. भारताने त्यात आपले पुरुष आणि महिला संघ उतरवले आहेत. जर भारतीय महिला संघ अंतिम फेरीत पोहोचला, तर त्याचे पदक निश्चित होईल, जे या खेळांमधील भारतीय क्रिकेटचे पहिले पदक असेल. जर भारताने फायनल जिंकली, तर सुवर्णपदक आणि हरले तर रौप्य पदक मिळेल. भारताला फक्त अंतिम फेरी गाठायची आहे आणि त्यानंतरच त्याचे ऐतिहासिक पदक निश्चित होईल.

या सामन्यांसाठी हरमनप्रीत कौर भारतीय संघाची कर्णधार आहे, पण आयसीसीने तिच्यावर दोन सामन्यांची बंदी घातली आहे. बांगलादेश दौऱ्यात तिच्या वाईट वागणुकीमुळे तिच्यावर ही बंदी घालण्यात आली आहे. याच कारणामुळे ती पहिल्या सामन्यात खेळली नाही. दुसऱ्या सामन्यातही ती खेळणार नाही. अशा स्थितीत पुन्हा एकदा संघाची कमान मंधानाच्या हाती असेल. कर्णधारपदासह फलंदाजीतही चमकदार कामगिरी करत मंधाना संघाला अंतिम फेरीत नेण्याचा प्रयत्न करेल. मलेशियाविरुद्ध मंधानाची बॅट चालली नाही, पण बांगलादेशविरुद्ध धावा करणे तिच्यासाठी आवश्यक आहे. पहिल्या सामन्यात शेफाली वर्मा आणि जेमिमाह रॉड्रिग्स यांनी शानदार फलंदाजी केली. शेफालीने अर्धशतक झळकावले होते, पण रॉड्रिग्सला अर्धशतक करता आले नाही. या सामन्यातही या दोघांनी चांगली फलंदाजी करावी, अशी संघाची इच्छा आहे.

या सामन्यातही टीम इंडियाची नजर बदला घेण्यावर असेल. आशियाई स्पर्धेपूर्वी भारताने बांगलादेशचा दौरा केला होता. भारताने टी-20 मालिका जिंकली होती. पण वनडे मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला होता आणि या सामन्यात हरमनप्रीत कौरचा वाद झाला होता. अंपायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत तिने बॅटने स्टंपवर आपटली होती.

दरम्यान महिला क्रिकेटमध्ये बांगलादेश संघ कमकुवत मानला जातो. पण या संघाने आपण काहीही करू शकतो, हे दाखवून दिले आहे. या संघाने भारताचा पराभव केला आहे आणि अशा परिस्थितीत भारत या संघाला हलके घेण्याची चूक करणार नाही. बांगलादेशची समस्या एवढीच आहे की त्यांनी या स्पर्धेमध्ये अद्याप एकही सामना खेळलेला नाही. उपांत्यपूर्व फेरीत ते हाँगकाँगविरुद्ध खेळणार होते, पण पावसामुळे हा सामना होऊ शकला नाही. मलेशियाविरुद्ध भारतीय फलंदाजांना फलंदाजीची संधी मिळाली, मात्र बांगलादेशचे खेळाडू रिकाम्या हाताने राहिले.

आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत चार उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांपैकी फक्त एकच सामना झाला आहे. उर्वरित तीन सामने पावसामुळे वाहून गेले. थायलंड आणि श्रीलंका यांच्यातील सामना केवळ एकच पूर्ण होऊ शकला होता, परंतु पावसामुळे हा सामना देखील 15 षटके प्रति डाव इतका कमी करण्यात आला. या सामन्यातही पावसाचे सावट आहे. जर हा सामना पावसामुळे वाहून गेला, तर भारत अंतिम फेरीत पोहोचेल कारण त्याचे रँकिंग बांगलादेशपेक्षा सरस आहे.