Gadar 2 Collection : शाहरुख खानचा हा मोठा विक्रम मोडला जाणार, सनी देओलच्या गदर 2 ने केली खळबळ


सनी देओलच्या गदर 2 या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम केले आहेत आणि आणखी अनेक विक्रम मोडणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि 39 दिवसांत याने 520 कोटींचा टप्पा पार केला आहे. अनेर वर्षांनंतर सनी देओलची गर्जना मोठ्या पडद्यावर झळकली आणि प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रेम दिले आहे.

गदरचा सिक्वेल बनवून सनी देओलने अनेक वर्षे सिनेजगतावर राज्य करणाऱ्या अनेक स्टार्सना स्पर्धा दिली. त्यांच्या चित्रपटाने इतकी कमाई केली की, सर्व मोठे स्टार्स त्याकडे डोळे लावून बसले. आधी त्याने सलमान खानला मागे सोडले. त्यानंतर आमिर खानला धूळ चारली. यानंतर बॉक्स ऑफिसवर अनेक वर्षे राज्य करणारा प्रभासचा बाहुबलीही मागे राहिला. आता सनी देओलची नजर शाहरुख खानच्या पठाणवर आहे.

या वर्षी जानेवारीत प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहासच बदलून टाकला. पठाण हा हिंदीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. पठाणच्या हिंदी व्हर्जनने 521.95 कोटींचा व्यवसाय केला होता. मात्र आता हा विक्रम धोक्यात आला आहे. वास्तविक, सनी देओलचा चित्रपट गदर 2 या विक्रमाच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि या आठवड्यात सनी देओल शाहरुख खानला मागे टाकेल असे मानले जात आहे.

जेव्हा गदर 2 थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा ते एखाद्या उत्सवासारखे होते. लोक ट्रॅक्टर घेऊन चित्रपटगृहात जाताना दिसत होते. त्याचा प्रभावही दिसून आला आणि पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने 284.63 कोटींची दमदार कमाई करून सर्वांना आश्चर्यचकित केले. दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाने 100 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला. आता 39 दिवसांत चित्रपटाची एकूण कमाई 520.60 कोटींवर पोहोचली आहे. निर्मात्यांनी तिकिटाचे दर कमी केले आहेत, त्यामुळे जवानच्या वादळातही चित्रपटाला प्रेक्षक मिळत आहेत. सर्व काही सुरळीत राहिल्यास येत्या तीन दिवसांत ते पठाणच्या हिंदी आवृत्तीचा पराभव करेल.