Video : सामन्यानंतर इशान किशन उघडपणे करु लागला विराटची नक्कल, त्यानंतर कोहलीने दिले असे प्रत्युत्तर


भारतीय क्रिकेट संघाने आशिया कप-2023 चे विजेतेपद पटकावले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने रविवारी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात एकतर्फी लढतीत श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. भारताने आठव्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे. हे विजेतेपद पटकावल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू खूप आनंदात होते आणि मस्ती करत होते. अशा परिस्थितीत इशान किशन आणि विराट कोहलीने असे काही केले की क्रिकेट चाहत्यांना हसू आले. या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने शानदार खेळ केला. त्याने श्रीलंकेला 15.2 षटकात अवघ्या 50 धावांत गुंडाळले. टीम इंडियाने हे लक्ष्य केवळ 6.1 षटकांत पूर्ण केले. आशिया कपमध्ये कोणत्याही संघाने केलेली ही सर्वात कमी धावसंख्या आहे.


सामना संपल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू मस्ती करत होते. सामना संपल्यानंतर कोहली, इशान किशन, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर, शुभमन गिल बोलत होते. दरम्यान अचानक इशान काहीतरी बोलला आणि तो विराट कोहलीची नक्कल करत त्याच्यासारखा चालायला लागला. इशान कोहलीच्या चालीची कॉपी करत होता. इशान कोहलीची अशी नक्कल करताना पाहून गिलसह सगळेच हसायला लागले. त्याची नक्कल पाहून कोहलीही हसायला लागला. कोहलीसारखे काही अंतर चालल्यानंतर इशान परतला आणि त्यानंतर कोहलीने इशानची कॉपी केली. यावर इशानच्या प्रतिक्रियेवरून जणू काही तो ‘मी असं वागत नाही’ असं म्हणतोय. त्यानंतर इशान पुन्हा कोहलीच्या चालीची कॉपी करू लागला.

केएल राहुलच्या दुखापतीमुळे इशानला या आशिया कपमध्ये संधी मिळाली. इशानला 2 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात संधी मिळाली आणि त्याने अर्धशतक झळकावले. या सामन्यात त्याने भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. यानंतर भारताच्या मधल्या फळीतून इशानला हटवणे कठीण झाले. या आशिया कपमधील प्रत्येक सामना तो खेळला. कोहलीनेही या स्पर्धेत चांगली कामगिरी केली. पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-4 सामन्यात त्याने शानदार शतक झळकावले.