सरकारची मोठी घोषणा, 75 लाख महिलांना मिळणार मोफत गॅस सिलिंडर


केंद्रातील मोदी सरकारने देशातील 75 लाख महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या अंतर्गत 75 लाख नवीन मोफत एलपीजी कनेक्शन वितरित केले जातील. सध्या 9.59 कोटी महिला उज्ज्वला योजनेचा लाभ घेत आहेत. नवीन मोफत एलपीजी कनेक्शनचे वितरण केल्यानंतर त्यांची संख्या 10 कोटींच्या पुढे जाईल.


उज्ज्वला योजना ही मोदी सरकारच्या प्रमुख योजनांपैकी एक आहे. देशभरातील मागासलेल्या आणि गरीब घटकातील महिलांना स्वच्छ स्वयंपाकाचे इंधन देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली होती. अलीकडेच, रक्षाबंधनाच्या निमित्ताने सरकारने देशभरात एलपीजी सिलिंडरवर 200 रुपयांची सबसिडी जाहीर केली होती. तर उज्ज्वला योजनेच्या महिला लाभार्थ्यांसाठी ही सवलत एकूण 400 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे.

या 75 लाख कनेक्शनचे पुढील 3 वर्षात वाटप करण्यात येणार असल्याचे मोदी सरकारने स्पष्ट केले आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत सरकार मोफत एलपीजी गॅस सिलिंडर कनेक्शनवर प्रत्येक कनेक्शनसाठी 2200 रुपये सबसिडी देईल. यावर सरकारी तिजोरीतून सुमारे 1650 कोटी रुपये खर्च होणार आहेत. पहिला सिलिंडर मोफत भरण्याचा संपूर्ण खर्च पेट्रोलियम कंपन्या उचलतील आणि मोफत गॅस शेगडीही पुरवतील.