नवीन संसद भवनात होणार विशेष अधिवेशन, गणेश चतुर्थीच्या दिवशी होणार स्थलांतर


मोदी सरकारने बोलावलेले संसदेचे विशेष अधिवेशन संसदेच्या नव्या आणि जुन्या दोन्ही इमारतींमध्ये होणार आहे. 18 सप्टेंबरपासून जुन्या संसद भवनात अधिवेशन सुरू होणार असले तरी 19 सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर ते नव्या संसद भवनात हलवण्यात येणार आहे. सरकारने 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे.

या वर्षी मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, अद्याप त्यात कामाला सुरुवात झाली नव्हती. पावसाळी अधिवेशन हे संपूर्णपणे संसदेच्या जुन्या इमारतीत झाले होते, मात्र आता विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याने संसदेचे कामकाज नव्या इमारतीत करण्यात येत आहे.

संसदेचे पुढील सर्व कामकाज आता नव्या इमारतीत होणार असल्याचे, म्हणजेच हिवाळी अधिवेशनही नव्या इमारतीतच होणार असल्याचे मानले जात आहे. मोदी सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात एकूण 5 बैठका होणार आहेत. या अधिवेशनाचा मुख्य अजेंडा काय असेल हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. मात्र, वन नेशन वन इलेक्शन, महिला आरक्षण विधेयक आणि इतर मुद्द्यांबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.


जर संसदेच्या नवीन इमारतीबद्दल बोलयाचे झाले, तर त्याची पायाभरणी 2020 मध्ये झाली होती, तर 2023 मध्ये तिचे उद्घाटन झाले आहे. ही इमारत जुन्या संसद भवनाशेजारी बांधलेली आहे, जी टाटा प्रोजेक्ट्सने बांधली आहे. केंद्र सरकारने सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत नवीन संसद भवन बांधले असून त्यात आधुनिक सुविधा आहेत.

या संसद भवनात राज्यसभा आणि लोकसभेतील अधिक खासदारांसाठी आसनक्षमता आहे, तर संयुक्त अधिवेशनासाठी 1280 खासदार एकत्र बसू शकतात. सुमारे 900 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बांधलेली नवीन संसद भवन आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे, ज्यामध्ये खासदारांसाठी संग्रहालय, ग्रंथालय आणि इतर विशेष सुविधांचा समावेश आहे.