आशिया चषकापूर्वी पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजाने दिला आश्‍चर्याचा धक्का, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली अचानक निवृत्ती


पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वहाब रियाझने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र, तो फ्रँचायझी क्रिकेटमध्ये खेळत राहणार आहे. त्‍याने त्‍याच्‍या 15 वर्षांची आंतरराष्‍ट्रीय कारकीर्द तात्‍काळ प्रभावाने संपवण्‍याचा निर्णय घेतला आहे. वहाबने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पाकिस्तानसाठी 27 कसोटी, 91 एकदिवसीय आणि 36 टी-20 सामने खेळले. 2020 मध्ये त्याने शेवटचा सामना खेळला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वहाबने वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण आता त्याच्या निवृत्तीवरून तो 2023 चा विश्वचषक खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

वहाब पाकिस्तान सुपर लीग 2023 मध्ये पेशावर जाल्मीकडून खेळताना दिसला होता. तो अलीकडेच पाकिस्तानच्या राजकारणात सामील झाला आहे आणि या वर्षी जानेवारीपासून तेथील पंजाब प्रांताच्या क्रीडा मंत्रीपदाची भूमिका बजावत आहे. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने ट्विट करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची माहिती दिली.


वहाबने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले की, मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हणत आहे. त्याच्या या शानदार कारकिर्दीबद्दल तो पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा आभारी आहे. त्याने आपल्या प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांचेही आभार मानले.


वहाबने गोलंदाज म्हणून आपल्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय स्पेल केले आहेत. तथापि, 2015 च्या एकदिवसीय विश्वचषकात शेन वॉटसनविरुद्धची त्याची गोलंदाजी केवळ त्याच्या कारकिर्दीतीलच नव्हे, तर एकदिवसीय इतिहासातील सर्वात घातक स्पेल असल्याचे मानले जाते.

कसोटी क्रिकेटमध्ये वहाब रियाझने पाकिस्तानकडून 34.50 च्या सरासरीने 83 बळी घेतले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 34.30 च्या सरासरीने 120 विकेट्स घेतल्या आहेत. तर टी-20 इंटरनॅशनलमध्ये वहाबने 28.55 च्या सरासरीने 34 विकेट घेतल्या आहेत. वहाबने पाकिस्तानसाठी 2011, 2015 आणि 2019 विश्वचषक खेळले आहेत.

2021 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत वहाबने 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या विश्वचषकानंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे त्याने सांगितले होते. पण, 2023 चा एकदिवसीय विश्वचषक खेळण्याची वहाबची इच्छा अपूर्णच राहिली.