नितीन देसाईंच्या ऑडिओ क्लिपमधून मिळाली अत्यंत महत्त्वाची माहिती, सरकारला केले भावनिक आवाहन..या कंपनीवर साधला निशाणा


ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. नितीन देसाई यांच्या कंपनीने कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतल्याचे बोलले जात आहे. पण सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितीन देसाई यांनी मृत्यूपूर्वी एक ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केली होती, ज्याची माहिती आता समोर येत आहे. मृत्यूपूर्वी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओमध्ये नितीन देसाई यांनी एडलवाईज कंपनीशिवाय इतर कोणावरही आरोप करत नसल्याचे म्हटले आहे.

नितीन देसाई यांनी एडलवाईस कंपनीमुळे कसे अडचणीत आलो, कशी फसवणूक झाली आणि मानसिक अस्वस्थता कशी आली याची माहिती ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये दिली आहे. या क्लिपमध्ये त्यांच्यासोबत झालेल्या विश्वासघाताबाबत बोलताना त्यांनी एडलवाईस कंपनीशिवाय आपल्या मृत्यूसाठी इतर कोणालाही दोष देत नसल्याचे म्हटले आहे.

नितीन देसाई यांनी लालबागच्या राजाला अखेरचा दंडवत करत ऑडिओ क्लिपमध्ये महाराष्ट्र सरकारला भावनिक आवाहन केले आहे. यामध्ये नितीन देसाई यांनी म्हटले आहे की, मी खूप मेहनत आणि खूप स्वप्ने घेऊन हा स्टुडिओ बनवला आहे. आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करून आणि त्यावर मात करून मी हा स्टुडिओ पूर्ण केला. आयुष्यात अनेक चढ-उतार आले, यश-अपयश आले, सर्व अडचणींचा सामना केला. हा स्टुडिओ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती आहे.

एडलवाईस कंपनीवर गंभीर आरोप करत नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओ ताब्यात घेण्याचे आवाहन सरकारला केले आहे, कारण त्याचा फायदा नितीन देसाई किंवा त्यांच्या कुटुंबाला होणार नाही, तर नवोदित कलाकारांना होणार आहे.

जगाचा निरोप घेऊनही भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या या कलादिग्दर्शकाने या स्टुडिओच्या माध्यमातून अनेक मेहनती आणि नवोदित कलाकार घडतील, अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे स्टुडिओ कोणत्याही कर्ज देणाऱ्या संस्थेच्या ताब्यात देऊ नये. त्याचे संरक्षण केले पाहिजे.

आपल्या शेवटच्या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये नितीन देसाई म्हणतात की, अनेक अडचणींचा सामना करत मी एनडी स्टुडिओचा हा धनुष्य उचलला आहे. आत्तापर्यंत मी हे शिवधनुष्य उचलले होते, पण आता अवघड होत आहे. या संकटातून बाहेर पडण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न केला, पण बाहेर पडू शकलो नाही. त्यामुळे आता थांबण्याची वेळ आली आहे.