पवारांनी शेअर केला PM मोदींसोबत स्टेज, ओवेसीची आगपाखड, म्हणाले – हा कसला ढोंगीपणा


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंच शेअर केला. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात दोन्ही नेते एकत्र दिसले होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेतून हटवण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्ष एकत्र आले असताना शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींसोबत स्टेज शेअर केला आहे. पंतप्रधानांसोबत दिसल्याने पवार निशाण्यावर आहेत. एआयएमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विटमध्ये पवारांवर हल्लाबोल करत, हा कसला ढोंगीपण असल्याचे म्हटले आहे.

ओवेसी यांनी लिहिले की, लोकसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष मणिपूरमध्ये होत असलेल्या प्रकरणावरुन आंदोलन करत आहेत आणि शरद पवार पुण्यात पीएम मोदींसोबत आनंदाने स्टेज शेअर करत आहेत. हा कोणता दांभिकपणा आहे? दुसरीकडे, कोणत्याही चर्चेविना हे विधेयक सभागृहात मंजूर करून घेतल्याने भाजप आनंदात आहे.


लोकमान्य टिळकांच्या वारशाचा गौरव करण्यासाठी टिळक स्मारक मंदिर ट्रस्टने 1983 मध्ये या पुरस्काराची स्थापना केली होती. यावेळी पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार मिळाला आहे. पंतप्रधान मोदींना त्यांच्या सर्वोच्च नेतृत्वासाठी आणि नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण केल्याबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ओवेसीच नाही तर शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) यांनीही पवारांवर निशाणा साधला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याने ज्यांना त्यांचा या कार्यक्रमातील सहभाग आवडला नाही, अशांच्या शंका पवार दूर करू शकले असते, असे पक्षाने म्हटले आहे. पक्षाने सांगितले की, देश हुकूमशाहीविरुद्ध लढत आहे आणि त्यासाठी 26 विरोधी पक्षांनी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली आहे. शरद पवार हे त्याचे महत्त्वाचे कमांडर आहेत. पवारांसारख्या नेत्याकडून जनतेच्या वेगळ्या अपेक्षा आहेत, असे शिवसेनेने (यूबीटी) म्हटले आहे.

पुण्यात समारंभ सुरू होण्यापूर्वी पीएम मोदी आणि शरद पवार एकमेकांशी बोलताना दिसले. पवारांनी पंतप्रधान मोदींच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. या कार्यक्रमाला शरद पवार यांचे पुतणे अजित पवारही उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्याशी हस्तांदोलन केले.