Ashes 2023 : जगातील अव्वल फलंदाज जो रूटने एका षटकात संपवली इंग्लंडची डोकेदुखी, बाद केले ऑस्ट्रेलियाचे 2 फलंदाज


अ‍ॅशेसच्या दुसऱ्या कसोटीत जगातील अव्वल कसोटी फलंदाज जो रूटने ऑस्ट्रेलियावर दुहेरी हल्ला केला. त्याने लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या दोन बड्या फलंदाजांना 4 चेंडूत पॅव्हेलियनमध्ये पाठवले. शिकार होत्या ट्रेव्हिस हेड आणि कॅमेरॉन ग्रीन. रूट जेव्हा गोलंदाजीला आला, तेव्हा स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यात 118 धावांची भागीदारी झाली.

ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर आधीच दडपण आणले होते, पण या जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांना अधिक अस्वस्थ केले. अशा स्थितीत रुट गोलंदाजीला आला आणि त्याने त्याच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ट्रॅव्हिस हेडचा डाव 77 धावांवर रोखला. रूटच्या चेंडूवर हेड यष्टिचीत झाला. बेअरस्टोने विकेटच्या मागे चांगली कामगिरी केली.


हेडने क्रीझवर परत जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा तोल बिघडला आणि तोपर्यंत बेअरस्टोने बेल्स उडवल्या होत्या. रुटने हेड आणि स्मिथमधील भागीदारीही तोडली. षटकाच्या 5व्या चेंडूवर रुटने जेम्स अँडरसनकरवी कॅमेरून ग्रीनला झेलबाद केले, तेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ हेडच्या फटक्यातून सावरलाही नव्हता.


ग्रीनला खाते उघडण्याची संधीही रूटने दिली नाही. रूटच्या एका षटकात केलेल्या दुहेरी हल्ल्यामुळे ऑस्ट्रेलियाने 316 धावांत 5 विकेट गमावल्या. मात्र, त्यानंतर इंग्लिश गोलंदाज ऑस्ट्रेलियाला कोणताही धक्का देऊ शकले नाहीत आणि दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 5 गडी गमावून 339 धावा केल्या. स्मिथ 85 धावांवर नाबाद आहे. तर दुसऱ्या टोकाला अॅलेक्स कॅरी 11 धावांवर नाबाद आहे.