MPL 2023 : शतक झळकावून अंकित बावणेने केले 2 विक्रम, आता धोनीच्या ‘करोडपती’ गोलंदाजाला 1 षटकात ठोकले 6 चौकार, VIDEO


महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये शतक झळकावल्यानंतर 10 दिवसात अंकित बावणेने आणखी एक मोठा पराक्रम केला. यावेळी त्याने एमएस धोनीच्या गोलंदाजावर निशाणा साधला आहे. आयपीएलमधून 1 कोटी 20 लाख रुपये मानधन घेणारा हा धोनीचा गोलंदाज आहे. प्रशांत सोलंकी असे त्याचे नाव आहे, ज्याच्या विरुद्ध अंकित बावणेने एकाच षटकात 6 चौकार मारले आहेत.

ज्या सामन्यात अंकित बावणेने धोनीचा गोलंदाज प्रशांत सोलंकी विरुद्ध धुमाकूळ घातला, तो सामना कोल्हापूर टस्कर्स आणि ईगल नाशिक टायटन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात अंकित बावणे हा कोल्हापूर टस्कर्सचा भाग होता. तर प्रशांत सोलंकी ईगल नाशिक टायटन्सकडून खेळत होता.


ईगल नाशिक टायटन्सने 10-10 षटकांच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत 9 गडी गमावून 89 धावा केल्या, प्रत्युत्तरात कोल्हापूर टस्कर्स संघाने 90 धावांचे लक्ष्य 9 षटकात 1 गडी गमावून पूर्ण केले. कोल्हापूर टस्कर्सला 92 धावांपर्यंत मजल मारण्यात अंकित बावणेने मोठी भूमिका बजावली, त्याने अवघ्या 27 चेंडूत नाबाद 62 धावा केल्या आणि शानदार अर्धशतक झळकावले. जवळपास 230 च्या स्ट्राईक रेटने खेळलेल्या अंकितच्या खेळीत 11 चौकार आणि 1 षटकारांचा समावेश होता.


अंकित बावणेच्या फलंदाजीचा सर्वाधिक थरार कोल्हापूर टस्कर्सच्या डावातील तिसऱ्या षटकात पाहायला मिळाला. त्याने आपल्या डावात मारलेल्या एकूण 11 चौकारांपैकी एकट्याने या एका षटकात 6 चौकार मारले. हे षटक प्रशांत सोलंकीने ईगल नाशिक टायटन्ससाठी टाकले. 10 षटकांच्या सामन्यात प्रशांत सोलंकीने त्याच्या कोट्यातील 2 षटके टाकली आणि एकूण 30 धावा दिल्या, त्यापैकी केवळ 1 षटकात त्याने 24 धावा दिल्या.

ईगल नाशिक टायटन्सविरुद्ध कोल्हापूर टस्कर्सच्या विजयात अंकित बावणे हिरो ठरला. अंकित बावणे हा तोच फलंदाज आहे ज्याने आपल्या T20 कारकिर्दीतील पहिले शतक झळकावताना महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या इतिहासातील पहिले शतकही झळकावले. 17 जून रोजी रत्नागिरी जेट्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने हे दोन्ही विक्रम एकत्र केले.